बंगालच्या निवडणुकीत सौरव गांगुली भाजपाचा चेहरा? टीएमसीने दिली अशी प्रतिक्रिया...
By बाळकृष्ण परब | Published: November 25, 2020 12:05 PM2020-11-25T12:05:17+5:302020-11-25T12:06:48+5:30
Sourav Ganguly News : पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपा भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला चेहरा बनवण्याची चर्चा रंगली आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला आता काही महिने राहिले आहे. बंगालच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपा भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला चेहरा बनवण्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या चर्चेवर तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राँय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुलीला गरीबांच्या समस्यांची माहिती नाही. जर गांगुली राजकारणात आला तर आपल्याला खूप दु:ख होईल, असे रॉय यांनी म्हटले आहे.
सौगत रॉय यांनी सांगितले की, सौरव गांगुली हे सर्व बंगाली जनतेचे आयकॉन आहेत. जर ते राजकारणात आले तर मी खूश होणार नाही. ते भारतीय क्रिकेटमधील एकमेव बंगाली कर्णधार राहिले आहेत. त्यांचे टीव्ही शोसुद्धा प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची राजकारणामध्ये काही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे ते राजकारणात फारसे टिकणार नाहीत.
सौगतो रॉय पुढे म्हणाले की, सौरव गांगुलीला देश आणि गरीबांच्या समस्यांबाबत माहिती नाही. तसेच गरीब आणि मजुरांच्या अडचणींची माहिती नाही. भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी कुणी उमेदवार नाही, त्यामुळेच ते अशा प्रकारच्या चर्चांना हवा देत आहेत, असा टोलाही रॉय यांनी लगावला.
बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा कुठल्याही चेहऱ्याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाकडून सौरव गांगुली हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याला कुणीही दुजोरा दिलेला नाही.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालमध्ये होते. तेव्हासुद्धा त्यांना याबाबत विचारण्यात आले होते. मात्र अमित शाह यांनी यावर काहीही उत्तर दिले नव्हते. याबाबत आतापर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा त्याची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
स्वत: सौरव गांगुली यांनीही अनेकदा राजकारणात सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. बंगालमध्ये मे २०२१ मध्ये निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत आतापासूनच टीएमसी आणि भाजपामध्ये लढाई सुरू झाली आहे.