सपा-बसपा महागठबंधनला पवारांचा बिनशर्त पाठिंबा, काँग्रेसच्या अडचणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:57 IST2019-04-03T19:52:19+5:302019-04-03T19:57:43+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.

सपा-बसपा महागठबंधनला पवारांचा बिनशर्त पाठिंबा, काँग्रेसच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशात राजकीय नेते रॅली आणि सभा घेऊन एकमेकांवर शरसंधान साधत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील चाणक्य नेते असलेल्या शरद पवारांनी सपा-बसपा महागठबंधनच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या महागठबंधनच्या सर्व उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हा आणि शहर कमिटीच्या संसदीय क्षेत्रातील महागठबंधनच्या उमेदवारांना महागठबंधनच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्याचे आदेशही दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, महाआघाडीची घोषणा होऊन महिना उलटला तरी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची घोषणा झाली नव्हती. अखेर आज सपा आणि बसपामधील जागावाटप जाहीर झाले आहे. या जागावाटपानुसार बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सपा आणि बसपामध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्रानुसार दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी काही जागा मित्रपक्षांना सोडून उर्वरित जागांचे आपसात वाटप केले आहे. त्यानुसार सपा 37 तर बसपा 38 जागांवर लढेल. सपा-बसपा महाआघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.