हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:56 AM2021-08-02T09:56:13+5:302021-08-02T09:56:22+5:30
फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत.
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत. भाजपलादेखील पडद्यामागील हालचालींतून काही सकारात्मक निष्कर्ष निघेल याची खात्रा नाही.
“विरोधकांनी सभागृहात येऊन चर्चेत सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते; परंतु ते दूर पळत आहेत. तथापि, त्यांना यातून काहीही मिळणार नाही”, असे भाजपचे लोकसभेतील प्रमुख प्रतोद (व्हीप) राकेश सिंह यांनी त्यांच्याशी रविवारी संपर्क साधल्यावर सांगितले.
केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांनी, “काँग्रेस हा हेरगिरीचा तर जेम्स बाँड होता,” असा आरोप केला. ते म्हणाले, “इतर काही विरोधी पक्षांचे धोरण हे आरोप करून पळून जायचे असे आहे.”
राज्यसभेतील नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी हे सभागृहातील कोंडी दूर करण्यासाठी काही विरोधी नेत्यांच्या संपर्कात आहेत. या प्रयत्नांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे; परंतु काही खासदारांचे मत असे की, कोंडी दूर करण्यासाठी मध्यम मार्ग काढण्यासाठी कदाचित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे योग्य नेते आहेत. या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने संसदेचे कामकाज होऊ शकलेले
नाही.