अफवांची धुळवड थांबवा; शहा आणि पवार भेट झालीच नाही - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:27 AM2021-03-30T06:27:48+5:302021-03-30T06:28:37+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कथित भेटीचे पडसाद सोमवारीही उमटत राहिले. या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीवरून राज्यातील नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Stop spreading rumors; Shah and Pawar never met - Sanjay Raut | अफवांची धुळवड थांबवा; शहा आणि पवार भेट झालीच नाही - संजय राऊत

अफवांची धुळवड थांबवा; शहा आणि पवार भेट झालीच नाही - संजय राऊत

Next

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कथित भेटीचे पडसाद सोमवारीही उमटत राहिले. या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीवरून राज्यातील नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर शेवटी ही भेट झालीच नसल्याचा दावा करत यासंदर्भातील अफवांची धुळवड थांबवा, असे विधान केले.

गृहमंत्री शहा यांची शरद पवार यांनी अहमदाबादेत भेट घेतल्याची चर्चा रविवारी सुरू झाली. त्यातच सर्वच बाबी सार्वजनिक करायच्या नसतात, अशी गुगली शहा यांनी टाकल्याने महाविकास आघाडीच्या गोटात भेटीवरून तर्कवितर्क लढविले जाऊ लागले होते. यावर, संजय राऊत यांनी सुरुवातीला अशा भेटी होतच राहतात, असे सांगत भेटीमागे फारसे राजकारण नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, असा प्रश्न करतानाच अमित शहांना आम्हीही भेटू शकतो. ते देशाचे गृहमंत्री आहेत. 

शिवाय, दिल्लीप्रमाणे आपले गृह शहर असलेल्या अहमदाबादेतही ते अनेकांना भेटी देत असतात, असे राऊत म्हणाले. तर, भेटीवरील अमित शहांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की, अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत असे अमित शहा म्हणाले. पण, गुप्त काहीच राहत नसते, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, त्याही सार्वजनिक होतात. यानंतर सायंकाळी मात्र राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शहा - पवार भेट झालीच नसल्याचा दावा केला. ‘मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही,’ असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातही राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देशात महाराष्ट्राचे नाव खराब झाले आहे. महाराष्ट्राला देशात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा माझा उद्देश नव्हता. सरकारमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे काम उत्तम सुरू आहे. फक्त, विरोधकांकडून जे वातावरण निर्माण केले जात आहे, ते करू देण्याची संधी विरोधकांना देऊ नये, हेच मला सांगायचे होते, असे राऊत म्हणाले. तसेच, महाविकास आघाडी सरकार स्थिर असून, पुढील साडेतीन वर्षे विरोधकांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. 

गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम 

रविवारी अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्याशी भेट झाली किंवा कसे, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ‘राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात’, असे सूचक विधान करत संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मतप्रदर्शन करत भाजप तेथे प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला.  

ही निव्वळ अफवा : नवाब मलिक
पवार - शहा भेट झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ही निव्वळ अफवा असून, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरविण्यात आल्या, त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही, असे मलिक म्हणाले. 

‘योग्य वेळी सर्व उघड होईल’
खुद्द शरद पवार यांनी या वृत्ताचे खंडन का नाही केले, असे विचारले असता ‘योग्य वेळी हे सर्व उघड होईल. पवारसाहेबांची ती सवय नाही. ते योग्य वेळेची निवड स्वत:च करतात’, असे असे राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

Web Title: Stop spreading rumors; Shah and Pawar never met - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.