रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुचवला काँग्रेसला नवा पर्याय; सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:31 AM2021-08-04T09:31:53+5:302021-08-04T09:33:15+5:30
Prasant Kishore: प्रशांत किशोर यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी हवी. पुढील काही महिन्यांत काँग्रेस संघटनात्मक स्तरावर मोठे बदल करणार आहे.
नवी दिल्ली – देशातील सर्वात जुन्या पक्षासोबत राजकीय चाणक्य प्रशांत किशोर नव्यानं राजकीय सुरुवात करणार की नाही, केली तर किशोर यांना काय जबाबदारी देणार? या प्रश्नावर लवकरच काँग्रेस पक्षाकडून निर्णय घेण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांना राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारीसोबतच पक्षाशी निगडीत निर्णयांमध्ये भूमिका हवी आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काही पर्यायही सुचवले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विशेष सल्लागार समिती गठित करायला हवी. जे राजकीय निर्णय घेईल असा पर्याय प्रशांत किशोर यांनी दिला आहे. या समितीत जास्त सदस्य नको. आघाडीसोबत निवडणूक प्रचार कॅम्पेनसह सर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ शकेल. आवश्यक कामं झाल्यानंतर ही समिती निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हायकमांडकडे किंवा कार्यकारी समितीत प्रस्ताव ठेवेल असं किशोर यांनी सूचवलं.
माहितीनुसार, प्रशांत किशोर यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी हवी. पुढील काही महिन्यांत काँग्रेस संघटनात्मक स्तरावर मोठे बदल करणार आहे. त्यानंतर अनेक नियुक्त्या आणि नवीन समिती गठीत केली जाईल असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
काँग्रेस पक्षात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना समाविष्ट करून घेण्याची शक्यता पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी शोधत आहेत. किशोर यांचा समावेश बोलणी सहजपणे पूर्ण झाली तर सरचिटणीस (व्यूहरचना) किंवा सोनिया गांधी यांचे सल्लागार म्हणून लवकर होऊ शकेल.
प्रशांत किशोर यांच्याशी १५ जुलै रोजी नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी ए. के. अँटोनी, मल्लिकार्जुन खरगे, कमल नाथ, के. सी. वेणुगाेपाल आणि अंबिका सोनी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे सल्लामसलत केली. प्रियांका गांधी यादेखील वरिष्ठ नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करीत आहेत. भाजपचा आक्रमकपणा आणि पक्षांतर्गत जी-२३ गटाच्या नेत्यांकडून गंभीर धोक्याला काँग्रेस तोंड देत असताना कोणतेही राजकीय वादळ निर्माण होऊ नये यासाठी सोनिया गांधी यांनी हे पाऊल उचलायच्या आधी खूप काळजी घेतली आहे. उच्चस्तरावरील सूत्रांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, प्रशांत किशोर यांनी १५ जुलै रोजीच्या बैठकीत केलेल्या सादरीकरणाने सोनिया गांधी खूप प्रभावित झाल्या. राजकीय विश्लेषकांनी मोदी हे अजिंक्य असल्याचे चित्र रंगवले असले तरी ते तसे नाहीत, असे प्रशांत किशोर यांनी म्हटल्याचे समजते.