सुभाष देसाईंच्या मुलाची २०० कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:06 AM2019-04-17T06:06:51+5:302019-04-17T06:07:14+5:30
राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलाने एका कंपनीत २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
महाड : राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलाने एका कंपनीत २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. योग्य वेळी या प्रकरणाचा पर्दाफाश करू, असा इशारा महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिला.
तटकरे मंगळवारी महाडच्या खाडीपट्टा येथे प्रचाराच्या सभेत बोलत होते. यानंतर त्यांनी साहिलनगर, गांधारपाले येथेही सभा घेतली. महाडचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाने पावन आहे. त्यांनी देशाला दिलेल्या संविधानावरच आज घाला घातला जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा उन्माद असा काही चढला आहे की हेच सरकार राहिले, तर २०२४ मध्ये निवडणुकाच होणार नाहीत, अशी भीती सर्वांना वाटते. देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने चालली आहे. गरीबांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. विविध आमिषे दाखवून दिशाभूल सुरू आहे. या हुकूमशाही, जातीयवादी शक्तींच्या विरोधात आपल्याला काम करायचे आहे, देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवायचे आहे, असा संदेश तटकरे यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना दिला.