सुजय विखे राष्ट्रवादीचे उमेदवार?; हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:11 AM2019-03-04T05:11:00+5:302019-03-04T05:11:29+5:30
अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडता डॉ़ सुजय विखे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे़
अहमदनगर : अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडता डॉ़ सुजय विखे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ पुढील दोन दिवसात निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असे खात्रीलायक वृत्त आहे़
अहमदनगर लोकसभेची जागा लढविण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे़ परंतु काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत़ त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला़ ही जागा काँग्रेसला सोडण्याची त्यांची मागणी आहे़ पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही निवडणूक लढविणारच, अशी भूमिका विखे वेळोवेळी मांडत आले आहेत़ पण, राष्ट्रवादीही जागा लढविण्यावर ठाम आहे़ त्यावर सुजय यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचा पर्याय पुढे आला आहे़ परंतु, विखे यांना उमेदवारी देण्यास कार्यकर्ते अनुकूल नाहीत़ गावागावात विखे गट निर्माण करण्याचा सुजय यांचा प्रयत्न राहिला आहे़ ते ग्रामपंचायत ते तालुका पातळीवरील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात़ त्याचा त्रास सर्वांनाच होईल़ त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़
>भाजपाकडून विरोध
काँग्रेसला जागा सुटत नसल्याने विखे यांनी सेना- भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली़ परंतु, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विखे यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.