'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 02:38 PM2024-10-12T14:38:01+5:302024-10-12T14:41:39+5:30
भगवान गड दसरा मेळावा लक्ष्मण हाके भाषण: सावरगावातील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही भाषण झाले.
Laxman Hake Pankaja Munde: "गावगाड्यात या तुम्हाला बघायला भेटेल की, माणसं काय करतात. एकीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांची लॉबी, दुसरीकडे ऊसतोड करणारे माझे बांधव. या माणसांची भाषा मी निश्चित कधीतरी बोलेन. सभेचा संकेत पाळून खूप काही बोलायचं होतं, बोललो नाही. माझं भाषण थांबवतो आणि एक घोषणा देतो... संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे", असे म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना विनंती केली.
सावरगावातील भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेही उपस्थित होते.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात लक्ष्मण हाके काय बोलले?
लक्ष्मण हाके म्हणाले, "ज्या संत भगवान बाबांनी या माझ्या भटक्या असणाऱ्या, महाराष्ट्रातील माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर,सणगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, नाभिक,सुतार, कुंभार, रामोशी... या महाराष्ट्रात बहुजनांची संख्या असणाऱ्या या माणसांचा आवाज बनण्याचं काम ज्या गोपीनाथराव मुंडेंनी केलं. त्या गोपीनाथराव मुंडे यांचे वारस पंकजाताई मुंडे, धनुभाऊ मुंडे..."
आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते -लक्ष्मण हाके
"अरे राजकारण होत असतं. निवडणुका येत असतात, जात असतात. हार-जीत होत असते. पण, पंकजाताई ज्यावेळी पराभूत झाल्या, त्यावेळी माझ्या महाराष्ट्रातील तरुणांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या म्हटलं की दक्षिणमधील नेत्यांची आठवण येते. पण, माझ्या महाराष्ट्रात गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या या तरुणांना माझं सांगणं आहे की, ज्या भगवान बाबांनी तुम्हाला सांगितलं की, प्रसंगी एक एकर जमीन विकली तरी चालेल पण पोरं शिकवली पाहिजे हा महामंत्र दिला. ज्या भगवान बाबांनी भटक्या समाजाला स्थिर जीवन दिलं. अध्यात्म शिकवलं. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील दीन दलितांना, भटक्या विमुक्तांना राजकीय स्थान प्राप्त करून दिलं", असे लक्ष्मण हाके म्हणाले.
"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्या मराठी भाषेत गावगाड्यातील सगळी माणसं राहतात. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, तुमच्याबरोबर असेन, पण मी एकच सांगतो की, ताई (पंकजा मुंडे) तुम्ही पुढं आलं पाहिजे. धनुभाऊ तुम्ही पुढं आलं पाहिजे. हा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आहात", अशी विनंती लक्ष्मण हाकेंनी केली.