"साहेब विजय सत्याचाच होईल", समर्थकांचा सोशल मीडियातून धनंजय मुंडेंना पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 09:05 PM2021-01-14T21:05:40+5:302021-01-14T21:05:52+5:30
तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला.
मुंबई
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.
तक्रारदार महिलेने सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर त्यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियात मुंडे यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर तर #We_Support_Dhananjay_munde हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.
अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीचा आढावाच कमेंटमध्ये मांडून त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देऊ केलीय. तर काहींनी धनंजय मुंडेंनी स्वत:हून समोर येऊन संबंधित महिलेसोबतच्या संबंधांची कबुली देऊन वस्तुस्थिती मांडल्याबाबत त्यांच्या पाठिशी उभं राहणं पसंत केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आजवर अनेक राजकीय संकटं आली आहेत. संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजला आहे. पण त्यांची माणसं आणि त्यांची माती त्यांच्यासोबत आहे, असंही काहींनी म्हटलंय.
शापित राजहंस👑
— राष्ट्रवादी बीड जिल्हा (@NCPSpeakBeed) January 13, 2021
संघर्ष तुझ्या पाचवीला,तुझी माती अन तुझी माणसे तुझ्या सोबतच....🤝#We_Support_Dhananjay_mundepic.twitter.com/wZ9oS2lK96
मुंडे आज नेहमीप्रमाणे 'जनता दरबारात'
धनंजय मुंडे प्रत्येक आठवड्याच्या दर गुरुवारी 'जनता दरबार' भरवतात. यात ते सर्वसामन्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. धनंजय मुंडे यांनी नेहमीप्रमाणे आजही जनता दरबाराला हजेरी लावली. पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता.
सदैव आपल्या सोबत! ❤️🤝🙏#We_Support_Dhananjay_Munde@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@supriya_sule@dhananjay_mundepic.twitter.com/qd5UprsLkG
— SHUBHAM CHAVAN (@Shubham10902447) January 13, 2021
शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
मुंडे यांच्यावरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार यांनी आज त्याबाबत सूचक विधानही केलं आहे. "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले आहेत.