आयोगाच्या कारवाईने सुप्रीम कोर्ट समाधानी; मायावतींना दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:31 AM2019-04-17T06:31:20+5:302019-04-17T06:32:20+5:30
निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.
नवी दिल्ली : प्रचारात प्रक्षोभक आणि विखारी भाषणे करून निवडणुकीचे नि:ष्पक्ष वातावरण गढूळ करणाऱ्या राजकीय नेत्यांना आवर घालण्यासाठी आम्ही फारसे काही करू शकत नाही, असे सांगणा-या निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले.
सोमवारी रात्री आयोगाने आझम खान यांच्यावर ७२ तास व मनेका गांधी यांच्यावर ४८ तास प्रचार करण्यास बंदी घातली. हे दोघे निवडणूक लढवत असल्याने त्यांना स्वत:चा प्रचार करणेही शक्य होणार नाही.
सोमवारी एका याचिकेच्या निमित्ताने हा विषय सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे उपस्थित झाला, तेव्हा आयोगाने हतबलता दाखविल्यावर न्यायालयाने आयोगाच्या अधिकारांची व्याप्ती मंगळवारी तपासून पाहण्याचे ठरविले होते, परंतु त्यानंतर आयोगाने ही कारवाई केली. त्यामुळे सरन्यायाधीशांनी ‘आयोगाला हरवलेले अधिकार सापडलेले दिसतात!’ असा शेरा मारून केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.