गुजरातमध्ये ‘आप’ला सापडला हिरा; कर्मचाऱ्यांना फ्लॅट अन् कार बोनस देणाऱ्या मालकाची राजकारणात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:45 PM2021-06-27T18:45:49+5:302021-06-27T18:47:53+5:30

जूनमध्ये झालेल्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत आप सगळ्या जागा लढवणार असल्याचं घोषित केले.

Surat Businessman Mahesh Savani Joins Aam Aadmi Party Ahead Of Gujarat Assembly Elections | गुजरातमध्ये ‘आप’ला सापडला हिरा; कर्मचाऱ्यांना फ्लॅट अन् कार बोनस देणाऱ्या मालकाची राजकारणात एन्ट्री

गुजरातमध्ये ‘आप’ला सापडला हिरा; कर्मचाऱ्यांना फ्लॅट अन् कार बोनस देणाऱ्या मालकाची राजकारणात एन्ट्री

Next
ठळक मुद्देप्रत्येक वर्षी दिवाळीला बोनसच्या रुपात सूरतमधील हिरा व्यापारी महेश सवानी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅटसारख्या महागड्या वस्तू देत असतातभावनगरमधील एका गावात राहणाऱ्या महेश सवानी यांचे वडील जवळपास ४० वर्षापूर्वी सूरत शहरात राहायला आले होतेआपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातच भाजपाला हरवण्याची योजना तयार केली आहे.

अहमदाबाद – दिल्लीच्या यशस्वी राजकारणानंतर आम आदमी पार्टी(AAP) आता गुजरात विधानसभेच्या निवडणूक मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. रविवारी गुजरातच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला. सूरत येथील हिऱ्याचे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश सवानी(Mahesh Savani) यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. गुजरातच्या सत्ताधारी भाजपाला हरवण्याचे उद्दिष्ट ठेऊन वाटचाल करणाऱ्या आम आदमी पक्षाला मोठं यश मिळालं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून म्हटलं की, गुजरातमधील यशस्वी उद्योगपती आणि प्रसिद्ध समाजसेवक महेश सवानी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. महेश सवानी यांचे पक्षात स्वागत आहे. गुजरातचं राजकारण आता नव्या दिशेने चालले आहे. महेश सवानी यांच्या पक्षप्रवेशाने गुजरातमधील आप पक्षाला गती प्राप्त होईल. फेब्रुवारी महिन्यात गुजरातच्या महापालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचेही सिसोदिया यांनी कौतुक केले.

कर्मचाऱ्यांना घर आणि कार दिवाळी भेट दिल्यानं प्रसिद्ध

प्रत्येक वर्षी दिवाळीला बोनसच्या रुपात सूरतमधील हिरा व्यापारी महेश सवानी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅटसारख्या महागड्या वस्तू देत असतात. त्याशिवाय सवानी यांनी ५०० पेक्षा अधिक मुलींची लग्न लावली आहेत. त्यामुळे महेश सवानी हे केवळ गुजरातमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत.

गुजरातच्या भावनगरमधील एका गावात राहणाऱ्या महेश सवानी यांचे वडील जवळपास ४० वर्षापूर्वी सूरत शहरात राहायला आले होते. तेव्हा त्यांनी हिऱ्यांना पॉलिश करण्याचं काम सुरू केले. हळूहळू हे काम वाढलं आणि ते यूनिट ओनर बनले. त्यांचे कुटुंब प्रत्येक मुलीच्या लग्नात जवळपास ४ लाख रुपये खर्च करण्याची क्षमता ठेवते. गुजरातच्या महापालिका निवडणुकीत १२० पैकी २७ जागा जिंकल्यानंतर आपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातच भाजपाला हरवण्याची योजना तयार केली आहे.

जूनमध्ये झालेल्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत आप सगळ्या जागा लढवणार असल्याचं घोषित केले. आम आदमी पक्षाने दिल्लीत यश मिळवल्यानंतर हळूहळू इतर राज्यातही पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. गुजरातसोबत आप उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका लढवण्याची योजना आखत आहे.

 

Web Title: Surat Businessman Mahesh Savani Joins Aam Aadmi Party Ahead Of Gujarat Assembly Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.