राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 07:45 PM2020-09-29T19:45:59+5:302020-09-29T19:51:25+5:30
मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षडयंत्र आखल्याचा देशमुखांचा आरोप
मुंबई: बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला. त्यांचा थेट रोख भाजपवर होता.
सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं विष आढळून आलं नसल्याचं एम्सच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू होता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र तरीही मुंबई पोलिसांना नाहक बदनाम करण्यात आलं. बिहारमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका राष्ट्रीय पक्षानं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भाजपचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केला.
AIIMS stated there's no trace of poison in Sushant Rajput's body as per viscera report. A national political party tried to defame Maharashtra & Mumbai Police for political gains, ahead of Bihar polls. Bihar ex-DGP Guptewshar Pandey also used for political gains: Maharashtra HM pic.twitter.com/rsqodnssOF
— ANI (@ANI) September 29, 2020
बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत प्रकरण पुढे नेण्यात आलं. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला. अनेकांवर आरोप करण्यात आले. मुंबई पोलीस काही जणांना वाचवत असल्याचे आरोप केले गेले. बिहारचे डीआयजी गुप्तेश्वर पांडे यांचाही यामध्ये उपयोग करून घेण्यात आला. आता पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे, असं देशमुख म्हणाले.
शरद पवारांची सीबीआयच्या तपासावर टीका
सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती तपास देऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयवर सडकून टीका केली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्याचं काम सीबीआयला दिलं गेलं. त्यांनी काय दिले, कुठे उजेड पाडला. तो त्याचा प्रकाश मला अजून तरी दिसलेला नाही, अशा शब्दांत पवार यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.