Sushant Singh Rajput Death Case: सुशांत प्रकरण सीबीआयकडे का गेलं?; ठाकरे सरकारनं आत्मचिंतन करावं- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 03:15 PM2020-08-19T15:15:20+5:302020-08-19T15:16:53+5:30
Sushant Singh Rajput Death Case: खासदार संजय राऊत यांनी आता तोंड बंद ठेवावं; राणेंचा सल्ला
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयानं आज या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाचा निकाल राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे. यावरून भाजपाचे खासदार नारायण राणेंनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. राज्य सरकारनं आत्मपरिक्षण करावं आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता तरी त्यांचं तोंड बंद ठेवावं, अशी जोरदार टीका राणेंनी केली.
सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाणं ही संपूर्ण भारतीयांची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे देऊन संपूर्ण भारतीयांच्या इच्छेचा आदरच केला आहे, असं मत राणेंनी व्यक्त केलं आहे. न्यायालय राज्यातील प्रकरणं सीबीआयकडेच का देतात? सरकारवर ही वेळ का आली? याचं आत्मपरिक्षण राज्य सरकारनं करावं, असा सल्लादेखील त्यांनी दिला. राज्यातील सरकार हे जनतेसाठी नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचं न्यायालयानं दिलेल्या निकालातून सिद्ध झालं आहे, अशा शब्दांत ते सरकारवर बरसले.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण संशयास्पदरित्या हाताळलं जात होतं. त्यामुळे न्यायालयाला निकाल राज्य सरकारच्या विरोधात जाणार हे दिसत होतं, असं राणे म्हणाले. आता या प्रकरणात राज्य सरकारनं पुन्हा आव्हान दिलं तरी काही फरक पडणार नाही. मुंबई पोलिसांच्या विरोधात गोळी सुटली आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटबद्दल भाष्य करणं राणेंनी टाळलं. पवार या विषयावर मला काहीच बोलायचं नाही, असं ते म्हणाले.