पार्थनं काय ट्विट केलंय, कसं आणि का लिहिलंय? याची माहिती नाही; रोहित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:04 PM2020-08-19T14:04:50+5:302020-08-19T14:05:31+5:30
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत.
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर पार्थ पवारांनी दोन शब्दात आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सत्यमेव जयते इतकीच प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दिली त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबीयातील मतभेदावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली. सुशांत प्रकरणात पार्थने सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते ट्विट केले यावर रोहित पवार म्हणाले की, पार्थनं काय ट्विट केले ते माहिती नाही, हे प्रकरण कोर्टात होतं, सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत पुढे काय भूमिका घ्यायची हा राज्य सरकारचा विषय आहे अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना रोहित यांनी दिली आहे. मात्र पार्थ यांची भूमिका राष्ट्रवादीच्या विरोधातली असल्याचीही चर्चा आहे.
मात्र पार्थ पवार यांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांच्या कुटुंबात ऑल इज वेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ पवार यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेतली होती. या पत्रात पार्थने मुंबई पोलीस हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहे. परंतु अनेक चाहत्यांच्या भावना आहेत की सुशांत प्रकरणात सीबीआयने तपास करावा, म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्त करावं असं पार्थ याने म्हटलं होतं.
त्यानंतर पार्थच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने हात वर करत ही भूमिका पार्थची वैयक्तिक आहे असं म्हटलं होतं. पार्थ पवारांच्या भूमिकेवर खुद्द शरद पवार यांनी जाहिरपणे पार्थ यांना फटकारलं होतं. माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही, तो इम्यॅचुअर आहे. गेल्या ५० वर्षापासून माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे असं सांगत त्यांनी पार्थचे कान टोचले होते. यानंतर पार्थ नाराज झाल्याचीही चर्चा सुरु होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ यांची प्रतिक्रियेवर राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. 'सीबीआय केवळ पाटण्यातील एफआयआरचा तपास करण्यासच सक्षम नाही, तर या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे दाखल झाल्यास त्यांचा तपासदेखील सीबीआय करेल असं न्यायालयाने म्हटलं आहे.