‘त्या’ सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी; आमदार रोहित पवार संतापले
By प्रविण मरगळे | Published: October 4, 2020 01:35 PM2020-10-04T13:35:08+5:302020-10-04T13:36:00+5:30
Sushant Singh Rajput, NCP Rohit Pawar News: मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी विरोधकांना चिमटा काढला.
मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राज्यात भाजपा नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली, विरोधकांच्या टीकेमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. यातच सुशांत सिंह प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आल्याने सत्ताधाऱ्यांना आयता मुद्दा सापडला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
याबाबत रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फिरलंय, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी असा टोला त्यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे.
बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.#सत्यमेवजयते
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2020
एम्सचा अहवाल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. १४ जून, २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. पण ही आत्महत्या आहे की हत्या, हे स्पष्ट झालेले नाही. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Sciences, New Delhi)च्या डॉक्टरांच्या एका पॅनेलने सीबीआयला आपले मत देत सांगितले की अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी साडे तीन महिन्यानंतर आलेल्या आत्महत्येच्या थेअरीला एम्स फॉरेंसिक टीमचा फायनल रिपोर्ट म्हटले जात आहे. हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे, ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे.
याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, आमच्याकडे अधिकृत माहिती नाहीय. जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती कळवू. यामुळे यावर काही वक्तव्य करणे उचित नाही. सीबीआय जी चौकशी करत आहे, तिचा अहवाल लवकरात लवकर यावा, लोकांच्या समोर यावा, यामुळे लोकांनाही सुशांतची हत्या की आत्महत्या ते समजेल, असे देशमुख म्हणाले.