“सरकारला आदित्य ठाकरे अन् पार्थ पवारच्या करिअरची चिंता; स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:30 PM2021-07-04T16:30:31+5:302021-07-04T16:32:08+5:30
Swapnil Lonkar Suicide: स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.
मुंबई – पुण्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरूणाच्या आत्महत्येमुळे(Swapnil Lonkar Suicide) विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लाखो MPSC ची तयारी करणारे तरूण परीक्षेची वाट बघत आहेत. वारंवार सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत धोरण सुधारा, तात्काळ परीक्षा द्या असं सांगूनही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार सुधारत नाही असा घणाघात भाजपा आमदार राम सातपुते(BJP Ram Satpute) यांनी केला आहे.
याबाबत आमदार राम सातपुते म्हणाले की, स्वप्निल लोणकर या तरूणाने जरी आत्महत्या केली असली तरी ती शासनाच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. सरकारचं नाकर्ते धोरण असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. MPSC परीक्षेची वाट पाहतायेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. आज मुलांनी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पीएसआय परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत, त्यांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. परंतु नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला.
तसेच सरकारला विद्यार्थ्यांचं काही देणंघेणं नाही. सरकारला फक्त आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्या करिअरची काळजी आहे. परंतु कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातून MPSC दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं त्यांना काही पडलं नाही. स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यानं तरूणानं घेतला गळफास #MPSC#SwapnilLonkarhttps://t.co/eb9mLpcOXF
— Lokmat (@MiLOKMAT) July 4, 2021
काय आहे प्रकरण?
स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या(MPSC) परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.
आत्महत्येमुळे MPSC विद्यार्थ्यांमध्ये रोष
MPSC स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेचे किरण निंभोरे यांनी सांगितले की, परीक्षेच्या तारखा जाहीर होत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नैराश्यात आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या आमच्या बांधवांना आत्महत्या करावी लागत असेल तर शासनाला जड जाईल. असेच होत राहिल्यास विद्यार्थी राज्यात मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही असा रोष विद्यार्थ्यांमध्ये आहे.