"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:53 PM2024-10-01T12:53:03+5:302024-10-01T12:55:33+5:30
Sunil Tatkare Sharad Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल भाष्य केले आहे.
Sharad Pawar Mahayuti: विधानसभा निवडणुकीच्या वारे जोरात वाहू लागले आहे. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याचा अंदाज असून, नेत्यांच्या भेटीगाठी, मुलाखती वाढल्या आहेत. शरद पवारही राज्यभर मतदारसंघ आणि उमेदवारांची चाचपणी करत आहेत. शरद पवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीसमोर आव्हान निर्माण करताना दिसत आहे. याबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले.
मुंबई तक युट्यूब चॅनेलला सुनील तटकरेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांना शरद पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
शरद पवारांबद्दल सुनील तटकरे काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांकडून जी खेळी सुरू आहेत, त्याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले, "आज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेले शरद पवार एकच आहेत. कारण त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांपासूनचे राजकारण पाहिले, अनुभवले आहे. त्या स्थित्यंतरांमध्ये ते आहेत. त्यामुळे त्यांच्या इतका पाठीशी अनुभव असलेला नेता या महाराष्ट्रात कुणी नाहीये, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग, या संबंध निवडणुकीच्या माध्यमातून ते करत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही."
पुढे तटकरे म्हणाले, "अनेक वेळा हेही होत असते की, समोरून सुद्धा आपापल्या पद्धतीने काहीतरी बांधणी होत असते. आज आम्ही सगळेजण जे काही आहोत, लोकसभेच्या वेळी आलेले अनुभव लक्षात घेऊन, त्यावेळी आमच्याकडून काही उणीवा राहिल्या महायुती म्हणून, त्या आमच्या सर्वांच्या लक्षात आल्या आहेत. शिंदे,देवेंद्रजी, आम्ही... त्या सगळ्या दूर करत या निवडणुकीची रणनीती आखण्यात आम्ही लक्ष ठेवून आहोत."
भान ठेवून आम्ही रणनीती आखतोय -सुनील तटकरे
"आम्हाला ही जाणीव आहे की, समोर शरद पवार आहेत. काँग्रेस आहे. काँग्रेसला एक नेता नसला, तरी मतदार आहे. उद्धवजी आहेत. त्या सगळ्यांचे भान आणि जाणीव ठेवून आम्ही आमची रणनीती शांतपण आखतोय", असे भाष्य त्यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात केले.
"शरद पवारांना हलक्यात घेणे आत्मघात"
शरद पवारांच्या अनुभवाचे महायुतीला आव्हान वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, "कसं आहे की, शेवटी निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला कुणाला हलक्यात घेता येत नाही. त्यातल्या त्यात शरद पवार साहेबांसारख्या नेतृत्वाला हलक्यात घेणे म्हणजे आत्मघात आहे. त्यामुळे आम्ही परिणाम आणि परिमाण दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून निवडणुकीची नीति तयार करतोय", असे सुनील तटकरे म्हणाले.