शिरूरसाठी लोकसभेसाठी अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:13 AM2019-03-05T01:13:03+5:302019-03-05T01:13:19+5:30
जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध सिनेअभिनेते व जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यानिमित्ताने ५ मार्च २०१९ रोजी दुपारी २ वाजता सभा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या मेळाव्यात शिरूर लोकसभेचे उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर होणार किंवा नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे उपनेतेपदाचा राजीनामा देऊन डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यामुळे जुन्नर तालुक्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नारायणगाव येथील या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप वळसे-पाटील व डॉ. अमोल कोल्हे, तसेच काँग्रेसचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, अनिल मेहेर, जि. प. सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, बाळासाहेब खिलारी, माऊली कुºहाडे, अमित बेनके, सूरज वाजगे, अरविंद लंबे, बाळासाहेब सदाकाळ, प्रवीण मुळे, अलका फुलपगार, उज्ज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, दशरथ पवार उपस्थित होते.