Raj Thackeray: 'एकदा शरद पवारांशी बोलून घ्या'; राज्यपालांची राज ठाकरेंना सूचना, अनेकांच्या भुवया उंचावल्या
By अमेय गोगटे | Published: October 29, 2020 05:05 PM2020-10-29T17:05:37+5:302020-10-29T17:13:55+5:30
Raj Thackeray Met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि राज्य सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, सल्ला देणं हे त्यांचं काम असतं. असं असताना, राज्य सरकारशी संबंधित विषयाबाबत त्यांनी अचानक शरद पवार यांच्याशी बोलण्याची सूचना का केली असावी?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन काळात आलेली अवाजवी वीज बिलं कमी करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती राज ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. अलीकडच्या काळात अनेक नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतलीय, त्यांच्यापुढे काही महत्त्वाचे विषय मांडलेत. राज्यपालांनी त्याची दखल घेऊन आवश्यक सूचनाही केल्यात. वर वर पाहता, राज ठाकरेंची भेटही तशाच स्वरूपाची. पण, राज यांना राज्यपालांनी केलेल्या सूचनेमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाढीव वीज बिलांच्या मुद्द्याबाबत एकदा शरद पवारांशी बोलून घ्या, असं राज्यपालांनी सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. ही सूचना काहीशी आश्चर्यकारक आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात आणि राज्य सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, सल्ला देणं हे त्यांचं काम असतं. असं असताना, राज्य सरकारशी संबंधित विषयाबाबत त्यांनी अचानक शरद पवार यांच्याशी बोलण्याची सूचना का केली असावी, असा प्रश्न अनेकांना पडलाय. राज्य सरकारमध्ये आपण सहभागी नाही, या सरकारचा 'रिमोट कंट्रोल' आपल्या हातात नाही, असं पवारांनी अनेकदा स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य सरकारचे प्रमुख आहेत. मग, त्यांच्याशी चर्चा करायला सांगण्याऐवजी राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांचं नाव का सांगितलं असेल, त्यातून त्यांना काही सूचित करायचंय की काय, अशी कुजबूज ऐकू येतेय.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020
“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट
काही दिवसांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील 'पत्रयुद्ध' चांगलंच गाजलं होतं. राज्यातील प्रार्थनास्थळं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारं रोखठोक पत्र पाठवलं होतं आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावेळी राज्यपालांच्या पत्रातील भाषा पवारांना खटकली होती. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्यपालांवर पुन्हा निशाणा साधला होता. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर विचार करा, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री यांच्यातील बेबनाव अजून कायम असल्याचेच संकेत मिळत आहेत.
सकाळी मोहन जी भागवत यांनी हिंदीतून देशाला उद्देशून एक भाष्य केलं. हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर का डोकं असेल तर त्या डोक्याला म्हणावं विचार करा, हे हिंदूत्व तुमचं पटतं का? #दसरामेळावाpic.twitter.com/EOU7pCLiPl
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 25, 2020
कुंथत कुंथत सरकार चालत नाही; ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा टोला
या पत्राची चर्चा संपते न संपते तोच, शरद पवारांनी राज्यपालांना पाठवलेलं पत्र जोरदार व्हायरल झालं आहे. राज्यपालांनी आपल्या एक वर्षाच्या कारकिर्दीवर प्रकाशित केलेलं कॉफी टेबल बुक अनेक मान्यवरांप्रमाणेच शरद पवार यांनाही पाठवलं. त्याबद्दल आभार मानण्यासाठी लिहिलेल्या पत्रात, पवारांनी टोमणेच जास्त मारल्याचं दिसतंय. स्वतःचा उल्लेख 'जनराज्यपाल' असा केल्याबद्दल शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारींना राज्यघटनेची आठवण करून दिली आहे. ''निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद ह्या माहिती पुस्तकात दिसून आली नाही'', अशी खोचक टिप्पणी शरद पवारांनी जाणीवपूर्वक केली आहे. आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल मी आपला पुनश्च आभारी आहे, असा उपरोधिक समारोप पवारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यपालांनी राज ठाकरेंना दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरतोय.
चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."
काय म्हणाले राज्यपाल?
''या सरकारमधे शरद पवारांचं ऐकलं जातं. त्यामुळे आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवेन, पण त्यावर सरकार काही करेल का, याबद्दल मला शंका आहे. म्हणून आपण शरद पवारांशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलेन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन'', अशी सूचना राज्यपालांनी राज ठाकरेंना केल्याचं 'एबीपी माझा'नं म्हटलंय. म्हणजेच, राज्य सरकार आपलं ऐकत नाही, शरद पवार नाही म्हणत असले तरी त्यांच्याकडेच सरकारचा 'रिमोट कंट्रोल' आहे, उद्धव ठाकरेंकडे नाही, असं राज्यपालांनी सूचित केलं आहे. त्यामुळे, एका दगडात दोन पक्षी मारण्याचाच हा राज्यपालांचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर आता सरकारकडून, विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून आणि शिवसेनेकडून कशी प्रतिक्रिया येते, हे बघावं लागेल.