ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, NDAमधील आणखी एका मित्रपक्षाने साथ सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:21 PM2021-03-09T17:21:43+5:302021-03-09T17:26:04+5:30
Assembly Elections 2021:पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएला अजून एक मोठा धक्का बसला आहे.
चेन्नई - तामिळनाडूमध्ये होत असलेली विधानसभेची निवडणूक भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना जड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Tamil Nadu Assembly Elections 2021) विविध ओपिनियन पोलमधून राज्यात द्रमुक-काँग्रेसच्या (DMK-Congress) यांच्या आघाडीचा विजय होणार असल्याचा कल वर्तवला जात आहे. अशा कठीण परिस्थितीत भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएला तामिळानाडूमध्ये अजून एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके (DMDK) या पक्षाने पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (A major blow to the BJP before the by-elections, DMDK left NDA )
तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर एआयएडीएमकेने दिलेल्या शब्दानुसार जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही आघाडी तोडत असल्याचे डीएमडीकेने म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी ६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल हा २ मे रोजी लागेल.
राज्यातील लोकप्रिय नेत्या राहिलेल्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा जाणार आहे. विरोधी पक्ष असलेल्या डीएमके आणि काँग्रेसने एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत या पक्षांना घवघवीत यश मिळाले होते. तर एनडीएला तामिळनाडूमध्ये नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, आता विधानसभा निडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दणदणीत विजय मिळवण्याची अपेक्षा एनडीएला असेल.
राज्यातील सत्ताधारी असलेल्या एआयएडीएमकेने आपला सहकारी पक्ष असलेल्या भाजपाला २३४ पैकी २० जागा देण्याची घोषणा केली होती. तर आघाडीतील अन्य मित्रपक्ष असलेल्या पीएमकेला २३ जागा दिल्या होत्या. दरम्यान एआयएडीएमकेने सहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर डीएमडीकेने एनडीएला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये एनडीए आणि यूपीएमधील घटक पक्षांसह अभिनेते कमल हसन यांचा पक्ष असलेला एमकेएम पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. एमकेएमने राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी १५४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर असदुद्दीन ओवेसांचा एआयएमआयएम पक्ष टीटीव्ही दिनाकरन यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एएमएमके) या पक्षाकडून आघाडी केली आहे.