Tamil Nadu Exit Poll 2021: तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:34 PM2021-04-29T20:34:59+5:302021-04-29T20:36:26+5:30
सत्तेत परतण्यासाठी एम.के.स्टालिन यांनी लावला जोर. पलानिसामीही सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील.
नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल येत्या २ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलीआहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी मतदान पार पडलं. या ठिकाणी ३९९८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. AIADMK चं नेतृत्व करत असलेल्या पलानीस्वामी यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं होतं. तर एका दशकानंतर डीएमकेला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी स्टालिनदेखील प्रयत्न करत आहेत. अशातच तामिळनाडूमध्ये बदल घडणार, की AIADMK च्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत येणार याचा निर्णय २ मे रोजी होईल.
तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच करूणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय या निवडणुका पार पडल्या. राज्याचं राजकारण कायमच AIADMK आणि DMK या दोन पक्षांच्या भोवती होतं. परंतु यावेळी अन्य काही पर्यायही होते. असं असलं तरी यावेळी तामिळनाडूत AIADMK आणि DMK या दोन पक्षातच मुख्य लढत होत असताना दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपासारख्या पक्षांचा या ठिकाणी तितक्या प्रमाणात जोर नाही.
यावेळी पुन्हा एकदा स्टॅलिन यांनी बाजी मारल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस-माय-इंडियाच्या एक्झिट पोलनुसार डीएमकेच्या नेतृत्वाखालील आघाडीला १७५ ते १९५ पर्यंत जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सत्ताधारी AIADMK आणि अन्यना ३८ ते ५४ जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं एक्स्झिट पोलनुसार दिसून येत आहे. तर टुडेज चाणक्यच्या आकडेवारीनुसार राज्यात सत्ताधारी पक्षाला ४६ ते ६८ आणि DMK+ ला १६४ ते १८६ जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२०१६ मध्ये AIADMK चा विजय
यापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये २३४ पैकी AIADMK आणि अन्य मिळून १३४ जागांवर विजय मिळवला होता. तर डीएमके आघाडीला एकूण ९८ जागा मिळाल्या होत्या. यावेळी अभिनेता ते नेता असा प्रवास केलेल्या कमल हासन यांचा पक्षही निवडणुकांमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. त्यांच्या मक्कम निधि मय्यम या पक्षानं १८० जागांवर निवडणूक लढवली होती. तर त्यांचा सहकारी पक्ष आयजेकेनं ३७ जागांवर निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएननं तीन जगांवर निवडणूक लढवली होती.