Tauktae Cyclone: केंद्र शासनाने गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला देखील भरीव मदत द्यावी: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:37 PM2021-05-20T21:37:05+5:302021-05-20T21:38:43+5:30
तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी.
अंबरनाथ: तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी. त्यासंदर्भात राज्य शासन देखील केंद्राकडे पाठपुरावा करणार आहेत. सोबतच ठाणे जिल्ह्यातील बाधीत शेतकरी आणि बाधित घरांचा पंचनामा करून त्यांना देखील योग्य मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आले होते. यावेळी फणशीपाडा भागात आदिवासी बांधवांच्या घरांच्या झालेली नुकसान आणि बारकुपाडा परिसरातील राज फासेपारधी लोकांच्या घरांचे झालेल्या नुकसानाची पाहणी पालक मंत्री यांनी केले. यावेळी ठाणे जिल्ह्या प्रमाणेच कोकणपट्टाला चक्री वादळाचा मोठा फटका बसला असून केंद्राने राज्याला गुजरात प्रमाणे भरीव मदत करणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप केंद्राने कोणती मदत जाहीर न केल्याने राज्य शासनाला या संदर्भात पाठपुरावा करत असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ तालुक्यात संदर्भात नुकसानीचा अहवाल घेतला असता तालुक्यात दोन हजाराहून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 365 हेक्टर शेत जमीन आणि फळ बागांमध्ये ेतकर्यांचे नुकसान झाले आहे. 932 शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले असून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे ज्यांचे या चक्रीवादळात नुकसान झाले आहे त्यांना शासनामार्फत मदत केली जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत आरोप-प्रत्यारोप करू नये
मराठा आरक्षणाबाबत काही लोक केंद्र आणि राज्य शासनावर आरोप करीत आहेत, मात्र ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नसून एकत्रितपणे निर्णय घेण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. राज्य शासन देखील केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करत असून भोसले कमिटीच्या अहवालानुसार न्यायालयीन प्रक्रियेत देखील दाद मागण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.