हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:05 AM2021-05-21T10:05:28+5:302021-05-21T10:29:48+5:30
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर; रत्नागिरीत प्रशासनासोबत आढावा बैठक
रत्नागिरी: विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते रत्नागिरीत आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.
हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र चार तासांच्या दौऱ्यातून परिस्थितीचं आणि संकटाचं गांभीर्य कसं कळणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यावर हेलिकॉप्टरनं पाहणी करत नाही. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आढावा घेत आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला.
मुंबई हाय दुर्घटनेत अजूनही २६ बेपत्ता; ४९ मृतदेह हाती, नौदलाचे शोधकार्य सुरूच
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा करत आहे. जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सिंधुदुर्गसाठी रवाना झाले आहेत. तिथे ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.