Corona Bed Scam: तेजस्वी सूर्या बेड स्कॅमवरून वादात; 'त्या' 17 कर्मचाऱ्यांची नावे वाचल्याने जातीयवादाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 11:58 AM2021-05-06T11:58:14+5:302021-05-06T12:00:39+5:30
Tejaswi Surya exposed bed Scam in Bengaluru hospitals: तेजस्वी सूर्या यांच्यासह काही नेत्यांनी बीबीएमपीमध्ये अधिकारी आणि काही लोक वेबसाईटवर बेड फुल झाल्याचे दाखवत होते. प्रत्यक्षात अनेक कोरोनाबाधित बरे होऊन जात होते. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत परंतू होम आयसोलेट आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते.
बंगळुरु महापालिकेचा कोरोना बेड स्कॅम (Corona Bed Scam) उघडकीस आणणारे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या वादात सापडले आहेत. तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी कोरोना काळात भाजपाचीच (BJP ) सत्ता असलेल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लाच घेऊन कोरोना रुग्णांना बेड दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. मात्र, त्यांचे आमदार असलेल्या काकांनी मदरशावर वक्तव्य केल्याने तेजस्वी यांच्यावर जातीय रंग दिल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. (BJP MP Tejaswi Surya in problem on Corona Bed scam issue; allegations of racism on them.)
तेजस्वी सूर्या यांच्यासह काही नेत्यांनी बीबीएमपीमध्ये अधिकारी आणि काही लोक वेबसाईटवर बेड फुल झाल्याचे दाखवत होते. प्रत्यक्षात अनेक कोरोनाबाधित बरे होऊन जात होते. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत परंतू होम आयसोलेट आहेत त्यांच्या नावे हे बेड आरक्षित केले जात होते. या रुग्णांना याची कल्पनाही नव्हती, असा आरोप सूर्या यांनी केला होता. या प्रकरणी बीबीएमपीने वॉर रुममध्ये असलेल्या 17 लोकांना कामावरून कमी केले आहे.
जातीयवादी अँगल दिल्याच्या आरोपावर सूर्या यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना व्हायरस हा एक धर्मनिरपेक्ष व्हायरस आहे. शेकडो लोकांच्या जिवाशी खेळणारे या घोटाळ्याला जातीयवादी अँगल देत आहेत. हा एक घोटाळा होता, मी मूर्ख नाहीय की अशा प्रकरणात जातीयवादी अँगल शोधत बसू. मी जेव्हा बीबीएमपी वॉर रुममध्ये गेलो तेव्हा मला समजले की 17 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मला तेथूनच नावे मिळाली, आणि मी ती नावे वाचून या लोकांना आरोग्य यंत्रणेमध्ये कोणत्या आधारे नियुक्त करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांना विचारले होते.
तेजस्वी सूर्या यांचे काका रवी सुब्रमण्यम यांनी बीबीएमपी अधिकाऱ्यांना जाब विचारताना हे लोक मदरशांमधून आले होते का असा सवाल केला. यावरून हा वाद निर्माण झाला आहे. यावर सूर्या यांनी सांगितले की, मी तिथे एकटाच नव्हतो. अन्य आमदारही होते. यामुळे काकांच्या वक्तव्याला मी जबाबदार नाही असे सूर्या यांनी सांगितले.
मी कोणाला आतंकवादी म्हटलेले नाही. सोशल मीडियावर जे काही बोलले जाते आहे त्याला मी जबाबदार नाही. चामराजनगरमधील संकटावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काही विरोधी नेते, लोक भाजपाला विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी अशाप्रकारचे आरोप करत आहेत. त्यांना या घोटाळ्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे, असा आरोप सूर्या यांनी केला.