महाराष्ट्राच्या राजकारणात होणार तेलंगणाच्या 'टिआरएस'ची एन्ट्री; ५ जागा लढण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 08:01 PM2019-09-18T20:01:13+5:302019-09-18T20:06:54+5:30
चंद्रशेखर राव यांचे ५ जागा लढण्याचे संकेत
- विशाल सोनटक्के
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील बिलोली, धर्माबाद या दोन तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी सहा महिन्यापूर्वी हे तालुके तेलंगणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली होती़ आता नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेवून टिआरएस पक्षाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची मागणी केली आहे़ विशेष म्हणजे चंद्रशेखर राव यांनीही या कार्यकर्त्यांना पाठिंबा देत निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे़
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुका तेंलगणाच्या सीमेवर आहे़ येथील सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देवून सदर तालुका तेलंगणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती़ त्यानंतर या मागणीचे लोण धर्माबादसह सीमावर्ती असलेल्या बिलोली तालुक्यातही पसरले होते़ तेलंगणा सरकार तेथील नागरिकांना विविध योजनाद्वारे लाभ देत आहे़ दुसरीकडे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून पुरेश्या सोई सुविधा मिळत नसल्याचा या नागरिकांचा आरोप होता. दरम्यान, ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्यासह पालकमंत्री रामदास कदम यांनी सीमावर्ती भागातील सदर मंडळींच्या बैठका घेवून संवाद साधला होता़ आणि या भागाच्या विकासासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही दिली होती़ तसेच ४० कोटीचे विशेष पॅकेजही जाहीर करण्यात आले होते़ त्यामुळे मध्यंतरीच्या काळात ही मागणी मागे पडली होती़ मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाच विधानसभा मतदारसंघातील काहींनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच भेट घेवून टिआरएसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उतरावे पक्षातर्फे आम्ही निवडणुका लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तेलंगणातील टिआरएसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे सदर पाच विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करीत आहेत़ निवडणुक लढविण्या संदर्भातील निर्णय ते लवकरच घेणार असून, यासाठी भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेवून या विषयावर ते चर्चा करणार आहेत़
कार्यकर्त्यांची विधानसभा लढण्याची मागणी
नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाबरोबर भिवंडी, सोलापूर आणि राजूरा येथील अनेकांनी भेट घेवून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत टिआरएस पक्षातर्फे निवडणुक लढविण्याची मागणी केली आहे़ पक्षाचा प्रमुख म्हणून या संदर्भातील निर्णय मी लवकरच घेणार आहे़ तेलंगणा सरकारने विविध लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत़ अशा पद्धतीच्या योजना महाराष्ट्र सरकारनेही राबवाव्यात असे महाराष्ट्रातील या पदाधिकाऱ्यांना वाटते़ त्यामुळेच त्यांच्याकडून टिआरएसकडे निवडणुक लढविण्याचा आग्रह धरला जात आहे़
- चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री तथा टिआरएस पक्षप्रमुख तेलंगणा