"शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय,’’ नितेश राणेंनी सेनेला डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:54 AM2021-06-17T08:54:50+5:302021-06-17T08:58:09+5:30
Maharashtra Politics News: नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. सेनाभवनासमोरील राड्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे.
मुंबई - राम मंदिराच्या वर्गणीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (Shiv Sena) केलेल्या टीकेनंतर काल सेनाभवनासमोर भाजपा (BJP)आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेनेचे कट्टर वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. सेनाभवनासमोरील राड्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे. ("Tell Shiv Sainiks, your Uddhav Thackeray has rubbed his nose in front of our Modi," Nitesh Rane told to Shiv Sena )
या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, सेनाभवनासमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा की, तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात. भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी सेनाभवनसमोर शिवसैनिकांशी भिडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.
जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..
— nitesh rane (@NiteshNRane) June 16, 2021
तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..
मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
मानले @BJYM4Mumbai ला !!
दरम्यान, राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित संख्येत आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले. शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी शिवसेना भवनापासून साधारण अर्धा किलोमीटरवरच या आंदोलकांना अडवले. त्यानंतर युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेले होते.