पार्थनंतर आता रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; पुन्हा चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 05:36 PM2020-08-16T17:36:30+5:302020-08-16T17:47:05+5:30
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांना टाळे लागलेले आहे.
पुणे : राज्यातील राजकारणात सध्या पवार कुटुंब हे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर फटकारले होते. यावरून सुरु झालेला वाद संपुष्टात येत नाही, तोपर्यंत आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळे सुरू करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विटरवरून मागणी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून मंदिरे खुली करता येणार नसल्याचे म्हटले होते. आता असे असतानाच महाविकास आघाडीचे नेतेच जर मंदिरे खुली करण्याची मागणी करत असतील तर यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांना टाळे लागलेले आहे. राज्यातही सर्वच धार्मिक स्थळे ही खबरदारी म्हणून सध्या बंद आहेत. राज्यात काल ३२२ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून आज दिवसभरात १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी काल ६ हजार ८४४ रुग्ण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या सहा लाखांच्या जवळ पोहचली आहे. राज्यात सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (अॅक्टिव्ह रुग्ण) प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.