जळगावचा बदला माथेरानमध्ये; भाजपचा शिवसेनेला दणका; १० नगरसेवक फोडत दे धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:43 AM2021-05-27T11:43:23+5:302021-05-27T11:44:21+5:30
शिवसेनेचे १४ पैकी १० नगरसेवक भाजपमध्ये; नगरपालिकेत आता भाजपला बहुमत
रायगड: जळगावमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे ६ नगरसेवक फोडले. याचा वचपा भाजपनं माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते. त्यातील दहा जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही कमळ हाती घेतलं आहे.
एकनाथ खडसे गटाला दे धक्का; सहा नगरसेवक शिवसेनेत
शिवसेनेच्या दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. ठाकूर यांची कार्यशैली व नेतृत्व भावल्यामुळं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं या नगरसेवकांचं म्हणणं आहे. शिवसेनेनं कालच जळगावच्या मुक्ताईनगरात भाजपला धक्का दिला. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आणखी चार नगरसेवक वेटिंगवर असल्याची माहिती आहे. शिवसेनेनं मुक्ताईनगरमध्ये केलेल्या राजकारणाला भाजपमध्ये माथेरानमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.
मुक्ताईनगरमधील राजकारण आणि बदललेलं पक्षीय बलाबल
१७ पैकी भाजपचे होते १३ नगरसेवक मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे सन २०१८ मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यानंतर झालेल्या निवडणुकीत १७ पैकी १३ नगरसेवक हे भाजपाचे अर्थातच एकनाथ खडसे गटाचे निवडून आले होते. एका अपक्ष उमेदवाराने खडसे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खडसे गटाकडे १४ नगरसेवक झाले होते. शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. हे नगरसेवक हे भाजपाचे असले तरी खडसे समर्थकच होते.