पूर्वांचलच्या वेगळ्या राज्यावरून नरेंद्र मोदी- योगी यांच्यात तणाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:11 AM2021-06-12T06:11:04+5:302021-06-12T06:11:42+5:30
narendra modi and yogi adityanath : योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर हा मतदारसंघही पूर्वांचलमध्ये जाणार आहे. यावरूनच मोदी आणि योगी यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे समजते.
लखनौ : गेली अनेक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत; परंतु सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे विभाजन करून पूर्वांचल हे नवे राज्य निर्माण करण्याचा भाजप नेत्यांचा विचार सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर हा मतदारसंघही पूर्वांचलमध्ये जाणार आहे. यावरूनच मोदी आणि योगी यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्वांचलमध्ये गोरखपूरसह २३ ते २५ जिल्ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो. यात विधानसभेचे १२५ मतदारसंघ येतात. या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ यांचा गट नाराज आहे. असे मानले जाते की उत्तर प्रदेशातील विजयाचा रस्ता पूर्वांचलमधूनच जातो. ज्या पक्षाला पूर्वांचलमध्ये सर्वाधिक जागा मिळतात त्यालाच राज्याची सत्ता काबीज करता येते.
मागच्या २७ वर्षांमध्ये पूर्वांचलमधील जनतेने कधीही एकाच पक्षाला सलग निवडून दिलेले नाही. २०१७ मध्ये तब्बल २७ वर्षांनंतर उत्तर प्रदेशात बहुमत मिळाले असले तरी पूर्वांचलमधील १० जिल्ह्यांमध्ये भाजप आजही कमजोर आहे. १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपची पहिल्यांदा सत्ता आली. तेव्हा पक्षाला २२१ जागा मिळाल्या होत्या. १९९१ नंतर २०१७ मध्ये भाजपला पूर्वांचलच्या २८ जिल्ह्यांमध्ये १६४ पैकी ११५ जागा जिंकता आल्या. पूर्वांचलमधील आझमगढ, जौनपूर, गाजीपूर, मऊ, बलिया, संतकबीरनगर, चंदौली, आंबेडकरनगर, प्रतापगढ आणि प्रयागराज या १० जिल्ह्यांत भाजपची स्थिती फारशी चांगली नाही.