राष्ट्रवादी-शिवसेना वाद पेटला; वेळ पडल्यास तलवारही काढू शकतो, NCP नेत्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:16 PM2022-01-17T16:16:41+5:302022-01-17T16:18:54+5:30

रस्ता रुंदीकरण, विविध विकास प्रकल्प यामध्ये गोरगरीबांची घरे बाधीत झालेली आहेत. त्या गोरगरीबांना न्याय हक्काने घरे मिळाली पाहिजेत. मात्र, या घरांमध्येच ठामपाच्या अधिकार्‍यांनी मोठा घोटाळा केला. या अधिकार्‍यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Thane NCP-Shiv Sena Controversy: NCP Anand Paranjape Warns Shivsena Yogesh Jankar | राष्ट्रवादी-शिवसेना वाद पेटला; वेळ पडल्यास तलवारही काढू शकतो, NCP नेत्याचा इशारा

राष्ट्रवादी-शिवसेना वाद पेटला; वेळ पडल्यास तलवारही काढू शकतो, NCP नेत्याचा इशारा

googlenewsNext

ठाणे - विविध प्रकल्पांमध्ये बाधीत झालेल्या नागरिकांना घरे देण्याऐवजी बोगस लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमून भ्रष्ट अधिकार्‍यांना निलंबित करावे, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी या घोटाळ्यामध्ये स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक महेश आहेर यांचाच सहभाग असल्याने त्यांना निलंबित करुन कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आनंद परांजपे यांनी केली. तर, शानू पठाण यांनी, धनदांडग्यांकडून पैसे घेऊन गोरगरीबांची घरे लाटण्यात आलेली आहेत. या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडवर कारवाई करावी, अशी मागणी केली.  

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने बाधितांचे पुनर्वसन करताना घरे देण्यात आली आहेत. एमएमआरडीएने ठामपाकडे घरे वर्ग केली आहेत. त्यानुसार ठामपाने यादी तयार करून घरांचे वाटप करण्यात आले. सन 2016 मधील रस्ता रूंदीकरणातील बाधितांना घरे दिली. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणार्‍या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस बायोमेट्रिक सर्वे, संगणकीय चाव्या तयार करण्यात आल्या आहेत. पालिका अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन कारवाई करावी,  या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.  

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी, “ गांधी लढे थे गोरोसे; हम लडेंगे चोरोंसे, चोर है चोर है, ठामपा अधिकारी चोरे है; पालिका आयुक्त होश मे आवो; अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. एमएमआरडीएच्या सदनिकांमध्ये घोटाळा झालेला आहे. रस्ता रुंदीकरण, विविध विकास प्रकल्प यामध्ये गोरगरीबांची घरे बाधीत झालेली आहेत. त्या गोरगरीबांना न्याय हक्काने घरे मिळाली पाहिजेत. मात्र, या घरांमध्येच ठामपाच्या अधिकार्‍यांनी मोठा घोटाळा केला. या अधिकार्‍यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्व घोटाळ्याच्या मागे महेश आहेर हेच कारणीभुत आहेत. ते अकरावी नापास आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी मी पत्र दिले; पुरावेही दिले होते. मात्र, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी थातूरमातूर जबाब घेऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. गोरगरीबांना घरे देण्याऐवजी धनदांडग्यांसाठी खोटे कागदपत्र आणि शिक्के बनवून ज्यांनी हे कृत्य केले आहे त्याचे मुख्य सूत्रधार महेश आहेर हेच आहेत. त्यांच्यावर कारवाई करायला पालिकेचे आयुक्त डॉ. शर्मा हे तयार नाहीत. त्यामुळे आयुक्तांच्या आशीर्वादाने हा घोटाळा होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जर खर्‍या अर्थाने निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर आहेर यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. जोपर्यंत त्यांना पदावरुन हटवित नाहीत. तो पर्यंत ह्या घोटाळ्याचा तपास योग्यरितीने होणार नाही. आपण ठाणे पोलिसांनाही विनंती करीत आहोत की, त्यांनीही दबावाला बळी न पडता या मास्टरमाईंडवर कारवाई केलीच पाहिजे. जर पोलिसांनी दबावाला बळी पडून कारवाई केली नाही तर आपण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहोत;आयुक्तांना आपण या निमित्ताने जाहीर आवाहन करीत आहोत की त्यांनीही महेश आहेर यांना निलंबित करावे अन्यथा आम्ही असे समजू की आयुक्तांचे भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठबळ आहे. दरम्यान, शानू पठाण यांनी, ठामपामध्ये वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हे भ्रष्टाचार अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय होत नाहीत. एकीकडे गोरगरीब बाधीतांना घरे दिली जात नाहीत; तर दुसरीकडे  धनदांडग्यांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रे आणि चाव्या बनविण्यात आलेल्या आहेत. याचा मास्टरमाईंड जो आहे; त्या अधिकार्‍यावर कारवाई करावी. आयुक्तांनी आपली जबाबदारी ओळखून संबधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करुन चौकशी समिती जाहीर केली नाही तर आपण कोविडचे नियम पाळत ठामपा मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा दिला. 

राम रेपाळे यांनी रोज बदाम खावेत
राम रेपाळे यांनी डावखरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोस्तीचा दाखला देत डॉ. आव्हाड यांची दोस्ती स्वार्थी असल्याचे म्हटले होते. याबाबत विचारले असता, रेपाळे यांनी डावखरे आणि शिंदे यांच्या दोस्तीचा दाखला दिला असला तरी राम रेपाळे यांच्या दोस्तीची मला किव येते. डावखरे आणि पालकमंत्र्यांच्या दोस्तीचा बळी राम रेपाळे हेच होते, 2012 ला राम रेपाळे हे पराभूत झाले होते; अन् त्याच प्रभागात योगेश जानकर हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यामुळे राम रेपाळे यांनी रोज बदाम खावेत; म्हणजे, त्यांची स्मरणशक्ती चांगली होईल, असा पलटवार आनंद परांजपे यांनी केला. 

जानकरांनी लायकीत रहावे
योगेश जानकर यांनी आनंद परांजपे यांना मंत्रोपचाराचा सल्ला दिला होता. त्यावर आनंद परांजपे यांनी जानकर यांना चांगलाच टोला लगावला.  ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जे ब्राम्हण मावळे होते. त्यांचाच वारसा चालविणारा मी ब्राम्हण आहे. मी भिक्षुकीही करु शको अन् तलवार घेऊन लढूही शकतो. योगेश जानकरांचा इतिहास-भूगोल मी बाहेर काढला ना तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या लायकीतच रहावे, एवढाचा मित्रत्वाचा सल्ला त्यांना देतो

Web Title: Thane NCP-Shiv Sena Controversy: NCP Anand Paranjape Warns Shivsena Yogesh Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.