BJP ला चर्चेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीचा कलगीतुरा; काय आहे रणनीती?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:03 PM2022-01-18T18:03:18+5:302022-01-18T18:04:46+5:30
राज्यात जेव्हा शिवसेना आणि भाजपची सत्ता होती, त्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यात मतभेद असल्याचे दाखवत नव्हते.
ठाणे : मागील निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित करीत ६७ नगरसेवक पालिकेवर धाडले. आता पुन्हा शिवसेनेची रणनीती ही एकहाती सत्ता संपादित करण्याची आहे. आघाडी केल्यास शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपामध्ये जाण्याची भीती स्थानिक नेत्यांना वाटते. स्वबळावर निवडणूक लढविल्यास शिवसेनेने १०० नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यामुळेच शिवसेनेला ही आघाडी नको असल्याचे स्थानिक नेते सांगतात.
राज्यात जेव्हा शिवसेना आणि भाजपची सत्ता होती, त्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्यात मतभेद असल्याचे दाखवत नव्हते. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कुरघोडी सुरू असायच्या. यामुळे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युतीच्या संबंधाबाबत साशंक असायचे व त्या वेळी सत्तेत असूनही शिवसेनाच विरोधकांची स्पेस काबीज करीत होती. आता भाजपविरोधात ठाण्यात शिवसेना व राष्ट्रवादी तीच रणनीती अवलंबित आहेत.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा आधार
राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाला जसे यश मिळेल त्यावर भविष्यातील विधानसभा निवडणुकीतील जागावाटप ठरणार आहे. कारण मागील विधानसभा निवडणूक युती व आघाडी करून लढली होती. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता महाविकास आघाडीचा प्रयोग केला गेला. त्यामुळे महापालिकांमधील ताकद हा आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा आधार राहणार आहे. त्यामुळेही शिवसेना व राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरू आहे.