तांबे-थोरात आणि काँग्रेसच्या वादात राष्ट्रवादीला विशेष रस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 01:37 AM2023-02-12T01:37:53+5:302023-02-12T01:41:59+5:30
महाविकास आघाडीची स्थिती शेअर बाजारासारखी झाली आहे. कधी भक्कम वाटते तर कधी पाया भुसभुशीत वाटतो. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद झाला. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाने दोघांवर निलंबनाची कारवाई केली.
बेरीज वजाबाकी
मिलिंद कुलकर्णी
महाविकास आघाडीची स्थिती शेअर बाजारासारखी झाली आहे. कधी भक्कम वाटते तर कधी पाया भुसभुशीत वाटतो. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद झाला. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाने दोघांवर निलंबनाची कारवाई केली. शिवसेनेने अपक्ष शुभांगी पाटील यांना पुरस्कृत करून आघाडीच्या उमेदवार म्हणून तिन्ही पक्षांची संमती घेतली. तांबे-पाटील अशी लढत असताना शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी तांबे या तरुण, अभ्यासू उमेदवाराला संधी द्यायला हवी होती, अशी विधाने केली. त्याचा अपेक्षित परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. थोरात यांच्या नाराजीनाम्याची चर्चा अजित पवारांनीच सुरू केली. नगर जिल्ह्यात काँग्रेस कमजोर झाली तर राष्ट्रवादीला ते हवे आहेच. नाशकात भुजबळ यांनी वेगळा सूर लावून संभ्रम वाढविला आहे. आघाडीतील पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसताना वरपांगी एकतेचे गोडवे गात असतात. नांदगाव येथे काँग्रेसने आदित्य ठाकरे यांचे केलेले स्वागत हेच दर्शवते.
निष्ठावंताच्या पाठीशी शरद पवार भक्कम
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा मुक्कामी नाशिक दौरा हा निष्ठावंतांच्या पाठीशी ते किती भक्कमपणे उभे असतात, हे दर्शविणारा होता. श्रीराम शेटे हे सहकार क्षेत्रातील त्यांचे विश्वासू सहकारी आहेत. दिंडोरीतील कादवा साखर कारखाना ते अत्यंत शिस्तबद्ध आणि काटकसरीने चालवत आहेत. जिल्ह्यातील इतर कारखाने सहकारातील तत्कालीन नेत्यांच्या अदूरदर्शीपणामुळे डबघाईला गेली असताना कादवा टप्प्याटप्प्याने प्रगती करीत आहे. शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करायला पवार वर्षभरात दुसऱ्यांदा येऊन गेले. मविप्र निवडणुकीत पवार यांचा शब्द अंतिम असतो. मात्र त्या शब्दाला जागले नाही तर काय घडते, हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिसून आले. सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी पवार आवर्जून उपस्थित राहिले. आयटक या साम्यवादी कामगार संघटनेच्या वीज कामगारांच्या अधिवेशनाला पवार उपस्थित होते. विचारधारेचे एकारलेपण वाढत असल्याच्या काळात पवार व आयटक यांच्या भूमिकेचे कौतुक वाटते.
नाशिकला महत्त्व, भाजपने ठसविले
प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशकात घेऊन भाजपने नाशिकचे पक्षीयदृष्ट्या महत्त्व अधोरेखित केले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिकचे पालकत्व घेतले होते. तेव्हा गिरीश महाजन पालकमंत्री होते. महापालिका, ५ आमदार व एक खासदार असे भक्कम समर्थन भाजपकडे होते. मात्र राज्यातील सत्ता गेल्याने पक्षात सैरभैर वातावरण होते. दरम्यानच्या काळात डॉ. भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने पुन्हा एकदा राज्य ताब्यात आले तरी एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही. नमामी गोदा, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड महामार्ग, आयटी हब, विमानसेवा असे केंद्र सरकारशी संबंधित प्रकल्प थंडबस्त्यात पडले. भाजपच्या नेत्यांनादेखील काही कळेना. विधान परिषद निवडणुकीतील पक्षीय भूमिका बुचकळ्यात टाकणारी होती. या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले. डबल इंजिनचे सरकार पाठीशी असल्याचा विश्वास या बैठकीने दिला.
तांबे-थोरात यांच्या भूमिकेमुळे धर्मसंकट
विधान परिषदेच्या निवडणुकीत डॉ. सुधीर व सत्यजित तांबे तसेच बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली संयमाची भूमिका निकालानंतर विस्फोटाच्या रूपाने समोर आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कारनामे सत्यजित यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत जाहीर केले. एकीकडे राहुल गांधी हे वैर सोडा, भारत जोडा असा संदेश देत देशभरात पदयात्रा काढत असताना त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेते एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानत असल्याचे विपरीत चित्र जनतेसमोर आले. थोरात यांनी जाहीर मत प्रदर्शन टाळत केवळ पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. आपली नाराजी व्यक्त केली. प्रत्येकवेळी आकांडतांडव करण्याची गरज नसते. मौनदेखील मोठा परिणाम साधते. आता तसेच झाले. तांबे - थोरात या एकनिष्ठ घराण्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न समोर आला आणि काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील हे रविवारी थोरात मुंबईत येत आहे. पटोले यांचे विरोधक आणि विशेषत: विदर्भातील स्पर्धक आक्रमक झाले आहेत. पक्षातील वादळ कोणते वळण घेते, हे लवकरच कळेल.
संभाजीराजे यांच्या वाढदिवसाची चर्चा
कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे यांनी वाढदिवस कोल्हापूर ऐवजी नाशकात साजरा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अनेक गावांमध्ये स्वराज्य सेनेच्या शाखा स्थापन केल्या तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठा आरक्षणावरून राज्य पिंजून काढलेल्या राजेंनी गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकीच्या अनुभवावरून सर्वच राजकीय पक्षांशी दोन हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. स्वत: ची संघटना स्थापन करून स्वाभिमानाने वाटचाल करण्याचा निर्णय राजेंनी घेतला. नाशकात शरद पवार यांचा दौरा आणि भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असताना त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला.त्याला प्रतिसाद चांगला मिळाला.त्यांच्या व संघटनेच्या वाटचालीकडे राजकीय पक्षांचे लक्ष आहे. मराठा आरक्षण, महाराजांचे गड किल्ले यांचे संरक्षण असे विषय राजेंनी अजेंड्यावर घेतले आहेत. ते देखील महत्वाचे आहेत.