'तत्कालीन फडणवीस सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक', हसन मुश्रिफांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:16 PM2021-07-02T15:16:29+5:302021-07-02T15:37:32+5:30
Hasan Mushrif : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
कोल्हापूर : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकारच उरला नसल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. तरीही तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
शुक्रवारी हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच, हे लोक सत्तेवर आल्यावरच इम्पिरीकल डाटा मिळणार आहे का?, असा सवाल करत इम्पिरीकल डाटा मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
याचबरोबर, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार स्वस्थ बसणार नाही. सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव करणारा भाजपा हा पहिलाच पक्ष आहे. जनता हे फार काळ सहन करत नाही, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
संभाजी ब्रिगेडची घोषणाबाजी
हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सभागृहात घुसले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मुश्रीफ यांना पत्रकार परिषद थांबवावी लागली. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पत्रकार परिषद सुरू झाली.