Sanjay Raut Exclusive: सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसाआधीच केली असती; शिवसेना नेते संजय राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 03:34 PM2021-08-26T15:34:58+5:302021-08-26T15:39:49+5:30
नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे.
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी त्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. नारायण राणेंच्या प्रत्येक गोष्टीवर बोलायला लागलो तर आम्ही इतर कामं कधी करायची? नारायण राणेंवर झालेली कारवाई ही कायद्यानं योग्यच आहे. राणेंवर दाखल झालेला गुन्हा कायद्याने योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे असं शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी सांगितले.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचं भान ठेवायला हवं. मोदी कॅबिनेटमधील एक मंत्री दाखवा जो बेताल वक्तव्य करून पुढे जातोय. परंतु नारायण राणेंचा स्वभाव आहे. नारायण राणे यांना उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु नारायण राणे महाराष्ट्रात आल्यापासून अतिशय घाणेरड्या शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. धोरणात्मक टीका होऊ शकते. पंतप्रधानांवर आम्हीही धोरणात्मक टीका केली आहे. कोण कुठला मुख्यमंत्री? मुख्यमंत्री गेला उडत. तिथेच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसाआधीच केली असती. केंद्रीय मंत्री आहे म्हणून आदर ठेवला. त्यांच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केले. २४ तासांत काय गुन्हा झाल्यानंतर २४ मिनिटांत, २४ सेकंदात अटक होते. गुन्हेगारांना संधी दिल्यास तो पळून जातो असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.
तसेच महाराष्ट्राच्या प्रतिमेचा, परंपरेचा भान ठेऊन जपून बोलावं. विलासराव देशमुखही अगदी विनोदी शैलीत समोरच्याला टोचून बोलायचे. शिवराळ भाषा म्हणजे शैली नाही. ठाकरे हे ठाकरे आहे. ठाकरे शैलीची तुलना करू नये. माझी लायकी काय आहे ते बाळासाहेबांना माहिती होतं म्हणून संपादक केले. म्हणजे बाळासाहेबांची लायकी नव्हती असं म्हणायचं का? तुम्हाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बनवलं, तुमची लायकी नव्हती का? शिवसेनेवर चिखलफेक करणं हे तुमचं काम नाही. तुमचं ध्येर्य राष्ट्रीय स्तरावर काम करावं असं संजय राऊत म्हणाले. नारायण राणे(Narayan Rane) यांना मंत्रिपद देऊन भाजपानं शिवसेनेला मदत केली आहे. त्याबद्दल मी भाजपाचे आभारी आहे असा टोलाही राऊतांनी भाजपाला काढला.
पश्चिम बंगालसोबत महाराष्ट्राची तुलना कमीपणा नाही
राणे म्हणतात, महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही. पण त्या राज्यात भाजपा नेत्यांची पळता भुई थोडी झाली. एका महिलेने भल्याभल्या नेत्यांना गाडून टाकलं. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं नातं आहे. त्यामुळे त्यात कमीपणा काहीच नाही. पश्चिम बंगाल ही क्रांतिकारकांची भूमी आहे. तसं महाराष्ट्र महापुरुषांची भूमी आहे. अभ्यास करा मग बोला. उगाच तोंडावर पडू नका असंही राऊतांनी राणेंना बजावलं.
शिवसेनेने केले अनिल परब यांचं समर्थन
अनिल परब हे सरकारमधील मंत्री आहेत. ज्या भागात राणेंना अटक केली त्याठिकाणचे पालकमंत्री अनिल परब आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून त्यांचीही आहे. त्यामुळे अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला त्यात झालं काय? ज्यांच्या वकिली चालत नाही ते राजकीय सल्ले देत बसतात अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांना सुनावलं आहे.