...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:33 PM2020-08-16T19:33:56+5:302020-08-16T19:35:22+5:30
माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का?
ठाणे - माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलेल्या आव्हानाला मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. जाधव म्हणाले की, येत्या दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना उचलून दाखवा अशी भाषा माजी महापौर करत असतील तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री होणारे का? गेल्या काही दिवसांपासून शिवसेना - मनसे या दोन्ही पक्षांचा सोशल मीडिया वॉर सुरू आहे.
दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत आहेत. जाधव यांच्यावर शनिवारी शिवसेनेचे खा. राजन विचारे आणि आ. प्रताप सरनाईक यांनी हल्लाबोल केला तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जाधव यांच्या टीकेला निदर्शनाच्या माध्यमातून चोख उत्तर दिले. माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का?
मी जे म्हणालो ते सेनेतील हुशार मंडळींनी समजून घेतलेले नाही. ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले त्यांना जेव्हा कधी आम्ही सत्तेत येऊ तेव्हा त्यांना उचलून जेलमध्ये टाकू आणि माझ्या या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी काय म्हणालो हे जनतेला कळत आहे पण शिवसेनेतील नेत्यांना नीट समजून घ्यायचे नाही. मी 13 ऑगस्ट रोजी सकाळी हे वाक्य बोललो त्यावर प्रतिक्रिया द्यायला शिवसेनेला दोन दिवस का लागले. दोन दिवसात त्यांच्यातील राग तयार होत नव्हता का? त्यांना हे बोलायला कोणीतरी लावत आहे आणि शिवसेना स्वतःचे हसू करून घेत आहे. येत्या दोन दिवसांत उचलून दाखवा असे माजी महापौर म्हणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत राजीनामा द्यावा आणि राज यांनी त्यांचा पदभार स्वीकारावा मग आम्ही पुढे करूच सगळे.