"...तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ"; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी
By प्रविण मरगळे | Published: January 19, 2021 03:51 PM2021-01-19T15:51:01+5:302021-01-19T15:55:37+5:30
सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले.
बंगळुरू – सीमाभागातील हुताम्यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावरून कर्नाटकच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटकातउद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. तर दुसरीकडे त्या राज्याचे गृहमंत्री बसवराज बोंमई महाराष्ट्राला पोकळ धमक्या देत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादात बोंमई यांनी सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलंय.
याबाबत बंगळुरू येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, तेव्हा गृहमंत्री बसवराज बोंमई म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर आमची बाजू कोर्टात सिद्ध झाली आहे, आमच्या राज्याची भूमी आम्ही सोडणार नाही. तर महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ते भाग कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बेळगावातील मराठी भाषिकांनी शांत राहण्याचा प्रयत्न करावा, ते कर्नाटकाचे आहेत असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनावश्यक बोलत आहेत, महाजन अहवाल अंतिम असून सीमाप्रश्न कधीच सुटलेला आहे. संसदेनेही महाजन अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे उगाच या विषयावर वादग्रस्त विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बेळगावात कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी विधाने करू नयेत. कदाचित मुख्यमंत्री ठाकरेंना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसत आहे, राजकीय स्वार्थासाठी त्यांच्याकडून अशाप्रकारे विधाने सुरू आहेत. सोलापूर आणि सांगली कर्नाटकात असावी यासाठी महाजन समितीच्या अहवालाचा आधार घेणार असल्याचं गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा काय म्हणाले?
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. उद्धव ठाकरेंचे विधान दुर्दैवी आहे. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. या बाजूची(कर्नाटक) एक इंचही जमीन कोणालाच दिली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले, यावेळी कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत असं ट्विट त्यांनी केलं होतं, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू. सीमावासीयांच्या लढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास नगरविकास आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता.