प्रचार रॅलीत रोज अडीच हजार समोसे होतात फस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:06 AM2019-04-17T00:06:56+5:302019-04-17T00:12:07+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला
अजित मांडके
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला असून या प्रचारात आघाडी घेण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जीवाचे रान करण्याचे ठरवले आहे; परंतु प्रचारात आघाडी घेताना कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गरज भासत असते. त्यामुळे रॅलीत सहभागी होणाºया प्रत्येकाला खूश करण्यासाठी विविध पक्षांकडून समोसा, पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचा मेनू फिक्स करण्यात आला आहे. त्यानुसार, सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास प्रचार रॅली काढताना रोज २५०० च्या आसपास समोसे फस्त होत असून तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या पत्रावळी उठत आहेत. यामध्ये वाराप्रमाणे व्हेज आणि नॉनव्हेज मेनू निश्चित केला आहे. कुपण घ्या आणि भरपेट खा, अशी स्किमसुद्धा राबवली जात आहे. तर, रोज सहा हजारांच्या आसपास छोट्या पाण्याच्या बाटल्या गटकल्या जात आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर, मतदारसंख्या २३ लाख ७० हजार ७४० एवढी आहे. या सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे रॅली, चौकसभांच्या माध्यमातून या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या सुरूआहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचार रॅली, चौकसभांचे आयोजन केले जात आहे. त्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी करण्यासाठी विविध पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सध्या उन्हाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उन्हातून रॅली काढताना पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रमुख काम या मंडळींना करावे लागत आहे. त्यानुसार, सकाळच्या सत्रात विविध पक्षांकडून सुमारे चार हजार आणि सायंकाळच्या सत्रात साधारणपणे दोन हजारांच्या आसपास छोट्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा केला जात आहे. केवळ पाणीच नाही, तर त्यांच्या नाश्त्याचीसुद्धा सोय केली जात आहे. त्यानुसार, सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास ठाण्यातील रॅलीमध्ये दोन ते अडीच हजार समोसे फस्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्यातील काही ठरावीक विक्रेत्यांची या निवडणुकीमुळे चांगलीच चंगळ झाली आहे. एका कार्यकर्त्याला दोन याप्रमाणे हे समोसे फस्त होत आहेत. दुपारी काही पदाधिकारी घरी जात असले, तरी काही पदाधिकारी उमेदवाराबरोबरच राहत असल्याने त्यांच्यासाठी जेवणावळीचीसुद्धा सोय करून देण्यात येत आहे.