“मुख्यमंत्र्याच्या मुलाचं लग्न असल्यानं लॉकडाऊन नाही”; व्हायरल मेसेजवर विजय रुपाणींचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:32 AM2021-04-08T10:32:24+5:302021-04-08T10:34:29+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांची मुलाचं लग्न होणार आहे. त्यामुळे गुजरातमध्ये लॉकडाऊन लागणार नाही
अहमदाबाद – देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले जात आहेत. कुठे लॉकडाऊन तर कुठे नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याचवेळी गुजरातमध्ये सध्या एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्स सोशल मीडियावर या मेसेजची खातरजमा न करता पुढे फॉरवर्ड करत आहेत. ज्यात मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावर खिल्ली उडवली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांची मुलाचं लग्न होणार आहे. त्यामुळे गुजरातमध्ये लॉकडाऊन लागणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुलगा रुषभच्या लग्नाचा मेसेजवरून मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या मुलाचं लग्न मे महिन्यात होणार असल्याची बातमी निराधार आहे असं विजय रूपाणी म्हणाले आहेत.
विजय रूपाणी म्हणाले की, अशाप्रकारे माझ्या मुलाच्या लग्नाबाबत कोणतं नियोजन नाही. सोशल मीडियात सुरू असणाऱ्या या बातम्या अफवा आहेत. सध्या माझं आणि माझ्या सरकारचं उद्देश गुजरातमधील कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्याचं आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता गुजरात हायकोर्टाने सरकारला वीकेंड लॉकडाऊन अथवा ३ ते ४ दिवसांचा कर्फ्यू लावण्याची सूचना केली आहे.
कोर्टाच्या निर्देशावरून उच्चस्तरीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न असल्याने लॉकडाऊन लागणार नाही. दुसरीकडे लॉकडाऊन होण्याची शक्यता असल्यानेही लोकांमध्ये दहशत पसरली आहे. लोक आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात आणि मॉलमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे सुरू आहे.