मतदान न केल्यास दंड वगैरे नाही; 'ती' बातमी 'होळी विशेष'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:26 PM2019-03-22T13:26:23+5:302019-03-22T13:48:46+5:30

निव्वळ करमणूक करणं, मनोरंजन हाच आमच्या बातमीमागचा हेतू होता.

There is no penalty or any fine if not vote; that news was just for entertainment | मतदान न केल्यास दंड वगैरे नाही; 'ती' बातमी 'होळी विशेष'

मतदान न केल्यास दंड वगैरे नाही; 'ती' बातमी 'होळी विशेष'

Next
ठळक मुद्देमतदान न करणाऱ्या व्यक्तीकडून असा कुठलाही दंड वगैरे आकारला जाणार नाहीए.होळी, धुळवडीनिमित्त करमणूक करणं, मनोरंजन हाच आमच्या बातमीमागचा हेतू होता.

लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास संबंधित व्यक्तीच्या खात्यातून ३५० रुपये वजा होतील, ही 'लोकमत डॉट कॉम'वरील बातमी 'बुरा न मानो होली है', या स्वरूपाची होती. मतदान न करणाऱ्या व्यक्तीकडून असा कुठलाही दंड वगैरे आकारला जाणार नाहीए. तसा कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला नाही. निव्वळ करमणूक करणं, मनोरंजन हाच आमच्या बातमीमागचा हेतू होता. परंतु, या बातमीचा राजकीय वापर होत असल्याचं लक्षात आल्यानं आम्ही हा खुलासा करत आहोत. 

होळीच्या, धुळवडीच्या दिवशी झाले गेले वाद, भांडणं विसरायची आणि एकमेकांना रंग लावून मैत्रीच्या रंगात रंगायचं, अशी परंपरा आहे. या दिवशी थोरामोठ्यांना रंग लावताना, बुरा न मानो होली है, असं म्हटलं जातं. तोच संदर्भ घेऊन, या दिवशी मजेशीर, मनोरंजनात्मक बातम्या गेली काही वर्षं केल्या जातात. त्याला अनुसरूनच, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या व्यक्तीला ३५० रुपयांचा दंड होणार असल्याची बातमी आम्ही दिली होती. बातमीच्या खाली 'बुरा न मानो होली है' असंही आम्ही ठळकपणे नमूद केलं होतं. परंतु, काही जण हे वाक्य डिलीट करून 'लोकमत'ची बातमी राजकीय लाभासाठी शेअर करत असल्याचं निदर्शनास आलंय. अर्थात, आपण सूज्ञ आहात. अशा चुकीच्या प्रचाराला तुम्ही बळी पडणार नाही, याची खात्री आहे. परंतु, कुणी या बातमीचा वापर अपप्रचारासाठी करत असेल, तर तुम्ही सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन आम्ही करू इच्छितो.

मतदान हा राज्यघटनेनं आपल्याला दिलेला अधिकार आहे. आपला खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी निवडण्याचा हा अधिकार आहे. दुर्दैवाने, अनेकांना त्याचं महत्त्व अद्याप कळलेलं नाही. परंतु, प्रत्येकाने हे कर्तव्य बजावलं पाहिजे, हीच प्रत्येक सुजाण देशवासीयाची प्रामाणिक भावना आहे. मला मतदान करायचंय, हे अंतःप्रेरणेतूनच यायला हवं. त्यासाठी आजवर कुणी बळजबरी किंवा दंड केलेला नाही आणि लोकशाही देशात तो होईल, असं वाटतही नाही.  

Web Title: There is no penalty or any fine if not vote; that news was just for entertainment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.