गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 06:42 PM2021-01-18T18:42:45+5:302021-01-18T18:43:40+5:30
Hasan Mushrif : आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात.
कोल्हापूर : गावात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. त्याला संदर्भ होता अर्थातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा.
भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे मुश्रीफ यांना आमदार पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली. तोच संदर्भ धरून दुपारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी ही संधी साधली.
मुश्रीफ यांच्या जिल्हा परिषदेतील भेटीवेळी भाजपाचे सदस्यही उपस्थित होते. त्यांनाही मुश्रीफ यांनी प्रत्येकी २५ लाखांचा विकास निधी दिला आणि भाजपाचे कारभारी सदस्य विजय भोजे यांच्याकडे पाहून मुश्रीफ म्हणाले, ‘अहो, ते खानापूरच्या निकालाचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नेत्याच्या गावातल्या पराभवाची चर्चा जास्त होते. आता तुमच्यासारखा कार्यकर्ता असे म्हणू शकतो, की गावात सत्ता नाही, तालुक्यात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि प्रदेशाध्यक्षपद मात्र आहे.’
मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यात कायमच राजकीय खेचाखेची सुरू असते. आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.