ईव्हीएममध्ये घोटाळा नाही - राजनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:14 PM2019-04-24T23:14:00+5:302019-04-24T23:15:12+5:30
विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांचा स्पष्ट निर्वाळा
नालासोपारा : इलेक्ट्रॉनिक व्होटींगमशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही जर असता तर काही राज्यात तुम्हची सत्ता आली असती का आपली सत्ता आली तर इव्हीएममध्ये घोटाळा होता असा आरोप करणे हा दुतोंडीपणा आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी येथील युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या विजय संकल्प सभेत केली. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम बद्दल का बोलले नाहीत असा आरोप राजनाथ सिंग यांनी केला आहे. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी राजेंद्र गाडीत यांना मत द्या व विजयी करा. राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तूती त्यांनी केली.
गरिबीच्या मुद्यावर आजपर्यंत काँग्रेसने राजकारण केले असून भाजप हा मतदारांच्या डोळ्यात धूळ झोकणारे राजकारण करत नाही तर देशाची मान उंचावेल असे राजकारण आजपर्यंत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार आतंकवादाचे दुष्मन असून तुम्ही कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे मतदान करा आणि गावीतला निवडून आणा असे आवाहनही त्यांनी केले. युती ही अबाधित असून ती कोणीही तोडू शकत नाही, शरद पवार यांनी पहिलीच हवा पाहिली म्हणून लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतली असेही ते म्हणाले.
दुनियेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढली आहे. रसिया, चीन आणि अमेरिका या मातब्बर देशांच्या पंगतीमध्ये लवकरच जाऊन बसणार, २०३० ते २०३१ च्या दरम्यान भारताचा अर्थसंकल्प खूप तेजीने वाढणार आहे.