‘वाचन प्रेरणा दिना’पासून सर्वत्र ग्रंथालये होणार सुरू; राज ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर प्रश्न निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:09 AM2020-10-11T00:09:33+5:302020-10-11T06:57:34+5:30
वाचनप्रेमींकरिता सरकार साधणार मुहूर्त । आदेशाची प्रतीक्षा, गुरुवारपासून वाचनाची भूक भागणार
कुलदीप घायवट
कल्याण : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ आॅक्टोबर हा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात असून याच दिवसापासून पुन्हा ग्रंथालये सुरू होतील. ग्रंथावरील धूळ झटकून पुन्हा वाचनप्रेमी आपापल्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांच्या ओढीने ग्रंथालयांकडे वळतील, अशी दाट शक्यता आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ बंद असलेली ग्रंथालये खुली करण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे.
उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत हे सध्या आजारी असल्याने वाचनालये सुरू करण्याच्या आदेशाला अंतिम स्वरूप देण्याची औपचारिकता बाकी आहे. गुरुवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून वाचन प्रेरणा दिनापासून वाचनालये सुरू करावी, अशी वाचनालयांची आग्रही मागणी आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यास वाचनालयांचे प्रतिनिधी गेले असता ठाकरे यांनी थेट सामंत यांना फोन लावला. त्यावेळी सामंत यांनीच तसे संकेत दिल्याचे समजते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठी भाषा विकास विभागाकडे असलेली ग्रंथालये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केली. कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयांतील ग्रंथालयेही बंद आहेत. कॉलेजमधील ग्रंथालयांबरोबरच सर्व ग्रंथालये बंद राहिली. वाचनालयेही सर्व नियम पाळून सुरू करावीत. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी व आर्थिक गर्तेतून वाचनालयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलावे, अशी साद वाचनप्रेमींनी घातली आहे.
सहा महिन्यांपासून वाचक आणि वाचनालये यांचा संबंध तुटला आहे. मार्चमध्ये नेलेली पुस्तके अजून परत मिळालेली नाहीत. अशी दोन ते अडीच हजार पुस्तके वाचकांकडे आहेत. शुल्कही थांबले आहे. पुस्तकांना सॅनिटाइझ करणे, वाळवीप्रतिबंधक उपाय करणे, वाचनालयांत काम करणाऱ्यांचा पगार देणे, अशा अनेक खर्चांमुळे वाचनालये आर्थिककोंडीत सापडली आहेत.- स्वाती गोडांबे, लिपिक, सार्वजनिक वाचनालय, कल्याण
राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत, यासाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पुस्तके ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात याची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर वाचनालये सुरू केली पाहिजेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले अर्थचक्र गतिमान होईल. - भिकू बारस्कर, सरचिटणीस, सार्वजनिक वाचनालय, कल्याण
लॉकडाऊनमुळे सहा महिने एकही नवीन पुस्तक वाचायला मिळाले नाही. लॉकडाऊनआधी एका महिन्यात पाच ते सहा पुस्तके वाचत होतो. वाचनालये बंद असल्याने खूप गैरसोय होत आहे. - विनायक घाटे, वाचक, कल्याण
एकदिवसीय जनता कर्फ्यू लागल्यानंतर वाचकांना अधिक पुस्तके देण्यास सुरु वात केली. इतरवेळी वाचकांना घरी घेऊन जाण्यासाठी दोन पुस्तके दिली जात होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये एकाच वेळी सहा पुस्तके देण्यात आली. साधारण एक हजार ५०० वाचकांना लॉकडाऊन काळात सहा पुस्तके दिली आहेत. - पुंडलिक पै, वाचनालयाचे संचालक
टीव्हीवरील त्याचत्याच बातम्या, सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. सहा महिन्यांत घरातील सर्व पुस्तके पुन्हा वाचली. आॅनलाइन वाचन गैरसोयीचे वाटते. सर्व खबरदारी घेऊन सरकारने वाचनालये सुरू करावीत. - सतीश घरत, वाचनप्रेमी, कल्याण