राणे असेपर्यंत कोकणाचे कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही- निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:10 PM2019-04-01T16:10:26+5:302019-04-01T16:12:13+5:30
निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सभा आणि रॅली काढल्या जात आहेत.
रत्नागिरी : निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. कोकणातही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊतांसमोर निलेश राणेंचं थेट आव्हान असणार आहे. निलेश राणेंनीही सभांचा सपाटा लावला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत काल स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निलेश राणे म्हणाले, 2014च्या मोदी लाटेत माझा पराभव झाला. परंतु तो माझा पराभव नव्हता आणि विनायक राऊत यांचा विजयही नव्हता, तर तो मोदींचा विजय होता. पाच वर्षांत सेना-भाजपाच्या सरकारनं काय केलं, फक्त भांडणं केलीत. रत्नागिरीला अद्यापही सत्ताधाऱ्यांनी न्याय दिलेला नाही. राणे असेपर्यंत कोकणचे कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. मी अर्धी निवडणूक जिंकलो आहे, अर्धी निवडणूक येत्या दिवसांत जिंकेन, कोणाच्याही मी कधी वैयक्तिक अंगावर गेलेलो नाही. ही निवडणूक कोकणच्या विकासाची आहे.
मागची पाच वर्षं फुकट गेली, आता येणारी पाच वर्षं फुकट घालवू नका, असंही निलेश राणे मतदारांना उद्देशून म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपाचे खासदार विनायक राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. खंबाटाकडून विनायक राऊत यांनी 400 कोटी घेतले आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. विनायक राऊतांमुळे कामगारांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली. जोपर्यंत राणे साहेब आहेत, तोपर्यंत कोकणावर अन्याय होणार नाही. रत्नागिरीत तीन आमदार असूनही पालकमंत्री जोगेश्वरीतला केला. कोकणाला ओळख द्यायची असेल तर डांबर चोर, मीटर चोरांना सभागृहात पाठवू नका, असं आवाहनही निलेश राणेंनी केलं आहे.