दगाफटका! ...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 07:54 AM2020-12-05T07:54:45+5:302020-12-05T07:59:53+5:30
Mamata Banerjee News: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ममता यांनी बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी असा एक नेता गेला तर त्याच्यासारखो लाख नेते आपण बनवू शकते, असे म्हटले होते. तसेच ममता यांनी शुभेंदू यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपूरचे टीएमसी प्रमुख तसेच कांथीचे खासदार शिशिर अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक पक्ष असलेल्या तृणमूलमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. एक आमदार आधीच भाजपात डेरेदाखल झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आणि ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यासोबतची शिष्टाई यशस्वी ठरल्य़ानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांना चांगलाच दम भरला आहे.
ममता यांनी शुक्रवारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले आहे. ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ममता यांनी बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी असा एक नेता गेला तर त्याच्यासारखो लाख नेते आपण बनवू शकते, असे म्हटले होते. तसेच ममता यांनी शुभेंदू यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपूरचे टीएमसी प्रमुख तसेच कांथीचे खासदार शिशिर अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांना पक्ष विरोधी कारवाया थांबविणे व जिल्हा संघटनेतील विरोध संपविण्यास सांगितले आहे. शिशिर यांन यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीकडे कूच केले आहे. तसेच केंद्र सरकारसोबत चर्चेची पाचवी फेरी आज होत आहे. ८ डिसेंबरला देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. यामुळे ममता यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. ८ डिसेंबरला मध्य कोलकातामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीन दिवशीय धरणे आंदोलन करण्याचे आदेश ममता यांनी तृणमूलच्या शेतकरी संघटनेला दिले आहेत.
शुभेंदू अधिकारींचे बंड
शुभेंदू अधिकारी हे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहात होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचा चर्चाही बंगालच्या राजकारणात रंगल्या होत्या. पश्चिम बंगालच्याराजकारणातील मोठे नाव असलेले शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वीपासून ते भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या राजीनामापत्रात शुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी माझ्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मी राज्यपालांनाही याबाबतची माहिती दिली आहे. तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.