“ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला
By प्रविण मरगळे | Published: November 17, 2020 12:21 PM2020-11-17T12:21:46+5:302020-11-17T12:24:32+5:30
Shiv Sena Balasaheb Thackeray, MNS News: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता.
मुंबई – शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना-मनसे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मुंबईच्या महापौरांचा बंगला घेण्यात आला होता. याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक होणार होतं, परंतु अद्याप स्मारकाची कोणतीही हालचाल होत नसल्याने मनसेने शिवसेनेला प्रश्न विचारले होते.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, स्मारक की मातोश्री ३ असं ट्विट केलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील ३ वर्षात याठिकाणी कोणतीही हालचाल नाही, बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे. ही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं? हे जनतेला सांगावे असं आवाहन त्यांनी शिवसेनेला केलं होतं.
त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावत म्हटलं की, ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले.
शिवसेना हिंदुत्ववादी
आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला, मात्र त्यांचा आत्मा, हिंदुत्व, विचार आणि मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. आजही देशाचं राजकारण भूमिपुत्र, बेरोजगार या दोन विषयांवर केंद्रीत आहे. बाळासाहेबांनी ५५ वर्षापूर्वी हा विषय मांडला होता. आज देशात सगळं राजकारण याच विषयावर आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे, कालही होती, आणि यापुढेही राहील असं संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब आमच्यासोबतच
गेल्यावर्षी या काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु होती, लोकांच्या मनात शंका होत्या. मात्र यंदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री तोसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यारुपाने मानवंदना द्यायला आलेत, बाळासाहेब आमच्यात नाहीत ती वेदना कायम आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे आमच्यासोबत सतत आहेत आणि राहतील प्रेरणा देत हा विश्वास आहे असं संजय राऊत म्हणाले.