पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 10:08 PM2020-12-13T22:08:20+5:302020-12-13T22:09:08+5:30

Rupali Chakankar : येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Those who return to the party should first work as activists - Rupali Chakankar | पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे - रुपाली चाकणकर 

Next

मीरारोड  - पक्षाला गरज होती, त्या अडचणीच्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तेच माझे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षात पुन्हा परतणाऱ्यांनी आधी कार्यकर्ता म्हणून काम करावे, पदांसाठी गडबड करू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाईंदर येथील महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना लगावला. 

मीरा भाईंदर महापालिकेत २००२ पासून २०१५ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर, आमदार, खासदार देणाऱ्या ह्या शहरात २०१७ च्या पालिका निवडणुकी आधी सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी सोडून वेगवेगळ्या पक्षात गेले. माजी आमदार , जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नाममात्र उरली. सध्या राष्ट्रवादीत सक्षम असा चेहरा वा नेतृत्व नाही, हे देखील तितकेच खरे आहे. 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर तसेच व्यक्तिगत हित पाहून माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसुरे आदी अनेक जण पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. तर काहींच्या नावाची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळवण्यासाठी देखील कदम, पाटील आदीं मध्ये चुरस लागली आहे. हे सर्व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे फिल्डिंग लावून आहेत. 

महामंडळचे अध्यक्ष पद, विरोधीपक्ष नेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पद आदी अनेक पदे राष्ट्रवादीमध्ये मिळून देखील २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्ष सोडून भाजपात गेलेले आसिफ शेख सुद्धा राष्ट्रवादीत परतण्यासाठी वरिष्ठ नेत्यां कडे साखरपेरणी करत आहेत . त्यामुळे अडचणीच्या पडत्या काळात स्वतःच्या स्वार्था साठी राष्ट्रवादी सोडून अन्यत्र पळ काढणाऱ्या ह्या पळपुट्याना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां कडून होत आहे. त्याचे पडसाद चाकणकर यांनी घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या बैठकी प्रसंगी देखील दिसून आले . 

चाकणकर म्हणाल्या की , "पक्ष सोडून गेलेल्यांऐवजी पक्षासोबत निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार. महिला आघाडीत तरी हाच निर्णय. पुन्हा आले तर त्यांना आधी कार्यकर्ता म्हणून कामे करण्यास सांगणार. त्यांनी पदांसाठी गडबड करू नये. आज निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. पक्ष संघटना म्हटली की बेरजेचे गणित असते. त्यामुळे पक्षात नव्याने आणि पुन्हा येणारे ही प्रक्रिया सुरूच असते. पदे द्यायला उशीर झाला, कारण कोरोना संसर्गाचे संकट होते व अजूनही कायम आहे."

याचबरोबर, पदे येतात - जातात. पदे आणखी काही महिन्यांनी वाटली तरी चालतील . काही फरक पडणार नाही. पण महाराष्ट्रवरील कोरोनाचा संकट दूर करणे महत्वाचे. मधली पाच वर्ष सत्तेत नव्हतो, आता सत्तेत आहोत. त्यामुळे आमदार - खासदार वाढतील. येणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकी आधी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झालेली दिसेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी पक्षाचे पौर्णिमा काटकर , संतोष पेंडुरकर , साजिद पटेल , सुप्रिया माईणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .  

Web Title: Those who return to the party should first work as activists - Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.