“हाथरस बलात्कारातील पीडितेला पेट्रोल टाकून जाळलं; अंत्यसंस्कार म्हणणाऱ्यांनी हिंदू ग्रंथ वाचावा”
By प्रविण मरगळे | Published: October 2, 2020 05:02 PM2020-10-02T17:02:00+5:302020-10-02T17:03:11+5:30
Hathras Gangrape, Shiv Sena Sanjay Raut News: त्या मुलीवर अंत्यसंस्कार केले की जाळण्याचा प्रकार होता? काही मीडियाने ते दाखवलं म्हणून ते सत्य समोर आलं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई – हाथरसच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर सत्य समोर आणावं, पंतप्रधानांनी भाष्य करावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत एका नटाच्या आत्महत्येनंतर बोलणारी कंगना राणौत आता काहीच बोलणार नाही. लोकांना चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक राजकीय पुढारे, दलित नेते, केंद्रीय मंत्री कंगनाच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचले, पण हाथरस घटनेनंतर हे नेते कुठे गायब झालेत? असा सवाल करत शिवसेनेने रामदास आठवलेंवरही निशाणा साधला आहे.
याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, ती मुलगी स्वत: कॅमेरासमोर सांगतेय तिच्यावर बलात्कार झाला आहे. मात्र तो बलात्कार नाही असं म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान करत आहेत. रामाच्या भूमीत सगळे नियम आणि कायदे उधळून लावले आहेत. २०१४ ते २०१९ या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या ४ राज्यात १७ हजाराच्या आसपास गँगरेप झाल्याची घटना आहे. सरकार कोणाचंही असेल अशा प्रकरणात काहीही दडपू नये. जेव्हा एखादी अशी घटना घडते, त्यावेळी मीडियाने तथ्यकथन लोकांसमोर आणावं, कोणतीही चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी मीडियाने जे घडलंय ते लोकांसमोर आणावं, त्यासाठी मीडियाला तिथे जाऊन द्यायला हवं असं त्यांनी सांगितले.
तसेच मध्यरात्री हाथरसच्या पीडितेवर पोलिसांनी पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळला, अंत्यसंस्कार केले नाहीत. याला कोणी अंत्यसंस्कार म्हणत असेल तर त्यांनी हिंदू धर्माचे ग्रंथ, पोती वाचल्या पाहिजे. एका अविवाहित कुमारिका मुलीवर कशारितीने अंत्यसंस्कार करावे याबद्दल हिंदू वेदात आणि ग्रंथात मार्गदर्शक लिहिलं आहे. त्या मुलीवर अंत्यसंस्कार केले की जाळण्याचा प्रकार होता? काही मीडियाने ते दाखवलं म्हणून ते सत्य समोर आलं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
लोकशाहीचा गळा घोटला जातोय
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी भगवे कपडे घालतात, ते सन्यासी आहेत. रामाचं मंदिर अयोध्येत उभं राहतंय, त्यासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी तिथे पूजा केली, सीतामाईची पूजाही झाली. आज हाथरसच्या मुलीच्या किंकाळ्या ऐकून सीतामाई पुन्हा एकदा आक्रोश करून धरणीमाई मला पोटात घे असं सांगत असेल. आज संपूर्ण देशात सन्नाटा पसरला आहे. लोकांना व्यक्त व्हायचं आहे पण मनात भीती आहे. अशाप्रकारे भीती असणं योग्य नाही. ज्याप्रकारे त्या मुलीचा गळा दाबला तशाप्रकारे देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय हे दिसतंय असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.
लोकशाहीवर सामुहिक बलात्कार
"हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. "उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे? हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे असं संजय राऊत म्हणाले.
बलात्कार झाला नाही शवचिकित्सा निष्कर्ष
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या शवचिकित्सेतून आढळून आले आहे. ही माहिती त्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या दलित मुलीचा मृत्यू गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमुद करण्यात आले आहे. तिच्या शवचिकित्सेमध्ये वीयार्चे अंश आढळून आले नाहीत.
शवविच्छेदन अहवालात काय ?
बलात्काराचा उल्लेख नाही
पीडितेच्या मणक्याला दुखापत
तरुणीच्या मानेलाही दुखापत
पीडितेला हार्ट अटॅक आला होता
ब्लड इन्फेक्शन झाले होते
२९ सप्टेंबर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले