पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी प्लॅन तयार?; राष्ट्रीय राजकारणाबाबत ममता बॅनर्जी ब्ल्यू प्रिंट आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:48 AM2021-07-10T11:48:37+5:302021-07-10T11:50:43+5:30
शुक्रवारी दुपारी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर आले होते. ३ तासानंतर प्रशांत किशोर बाहेर पडले.
कोलकाता – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस(TMC) पुढची रणनीती आखत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(CM Mamata Banerjee) आता पक्षाला राष्ट्रीय राजकारणात उतरवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय राजकारणातील धोरण आखणण्याबाबत रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि ममता बॅनर्जी यांच्यात शुक्रवारी तब्बल ३ तास बैठक पार पडली.
शुक्रवारी दुपारी ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर आले होते. ३ तासानंतर प्रशांत किशोर बाहेर पडले. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत राष्ट्रीय राजकारणावर चर्चा झाली. या बैठकीनंतर पुढील आठवड्यात टीएमसीने जिल्हास्तरीय पक्ष संघटनेची बैठक बोलावली आहे. यात प्रत्येक व्यक्तीला एक पद धोरण लागू करून जिल्हास्तरीय संघटनेत फेरबदल केले जातील. आता अनेक नेते असे आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक पद आहेत.
इतकचं नाही तर राष्ट्रीय राजकारणाबाबत प्रशांत किशोर यांच्याकडून आढावा घेतला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांची ताकद वाढली आहे. आगामी काळात ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय भूमिकेत दिसू शकतात. टीएमसीकडून एक ब्ल्यू प्रिंट बनवण्यात येत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अथवा ऑगस्टपर्यंत ही ब्ल्यू प्रिंट लोकांसमोर आणली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चेत त्रिपुरापासून सुरूवात झाली. कोणकोणत्या राज्यात टीएमसी पसरू शकते. कशारितीने पुढे वाटचाल केली पाहिजे. प्रत्येक राज्यात टीएमसीचं राजकारण काय असलं पाहिजे? या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
प्रशांत किशोर आणि शरद पवारांचीही झाली होती भेट
काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथील शरद पवारांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली होती. शरद पवार(Sharad Pawar) आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर विरोधकांची बैठक झाली. यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
मात्र चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं होतं. 'माझा तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपाला यशस्वीपणे आव्हान देईल यावर माझा विश्वास नाही,' असं किशोर यांनी म्हटलं होतं. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली होती. पवार आणि किशोर मुंबईत 'सिल्व्हर ओक'वर ११ जूनला भेटले होते. त्यानंतर दिल्लीच्या निवासस्थानीही भेट झाली होती. ती भेटदेखील बराच वेळ सुरू होती. या बैठकीत मिशन २०२४ वर चर्चा झाल्याचंही बोललं गेले.