अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 04:02 PM2020-12-19T16:02:59+5:302020-12-19T16:06:17+5:30

west Bengal Politics: गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

TMC MP, 11 MLAs joins BJP in West Bengal presence of Amit shah | अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

Next

कोलकाता : जेव्हा प. बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. 


गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी ममता सरकारमध्ये नाराज असलेल्या आमदार, खासदारांना फोडण्याचे प्रयत्न केला होता. आज या नाराजांनी अधिकारी यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. यामध्ये तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिश्वास,  सुक्र मुंडा, श्यामपदा मुखर्जी,  विश्वजीत कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे. 


यावेळी अधिकारी यांनी ममता यांच्या सरकारवर टीका केली. प. बंगालची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. जर राज्याला वाचवायचे असेल तर त्याची कडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. 
यानंतर अमित शहा यांनी ममता यांच्यावर टीका केली. ममता सांगतात की भाजपा सर्व पक्षांतून नेत्यांची आयात करते. मात्र, त्यांना लक्षात आणून देवू इच्छितो की त्यांचा मूळ पक्ष हा काँग्रेसचा होता. ही तर साधी लाट आहे. मी ज्या प्रकारची त्सुनामी पाहतोय, याची ममता यांनी कल्पनाही केली नसेल. ममता आता एकट्याच राहतील. जे लोक भाजपात येत आहेत ते लोक माँ-माटी-मानुषच्या नाऱ्यासोबत पुढे आले होते. आज त्या लोकांचा मोहभंग झाला आहे. 




मोदींनी गरीबांसाठी जे अन्नधान्य पाठविलेले ते तृणमूल काँग्रेसने फस्त केले. भाजपाध्यक्षांच्या ताफ्यावर मोठमोठे दगड फेकले गेले, आम्ही यामुळे घाबरणारे नाही. प. बंगालच्या लोकांनी आता सत्तांतराचे मन बनविले आहे, असेही शहा म्हणाले. 


अधिकाऱ्यांचे जाणे परवडणार नाही
आपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंदू हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे ममता बॅनर्जींना परवडणारे नाहीय. 

Web Title: TMC MP, 11 MLAs joins BJP in West Bengal presence of Amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.