"टोपे दुसऱ्या विभागाबद्दल बोलतात, मी बोललो तर काय फरक पडतो?", विजय वडेट्टीवार यांचा श्रेष्ठींना सवाल
By अतुल कुलकर्णी | Published: June 6, 2021 06:27 AM2021-06-06T06:27:10+5:302021-06-06T06:30:13+5:30
Vijay Wadettiwar : या प्रस्तावाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून ही माहिती महाराष्ट्राला देणार होते, असे असताना विजय वडेट्टीवार यांनी परीक्षांच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे सांगतानाही लॉक-अनलॉकची माहिती दिली.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे शाळांच्या परीक्षा होणार की नाही, याविषयी बोलतात. लॉकडाऊन किती दिवस वाढणार, हे देखील सांगतात. मग जो विषय माझ्या विभागाचा आहे, त्याची मी माहिती दिली तर काय बिघडले? असा सवाल मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लॉक-अनलॉक याविषयी शास्त्रीय पद्धतीने नियमावली तयार करण्याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होती. त्यांनी तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाच्यावतीने बैठकीत चर्चेला आला. त्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रस्तावाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून ही माहिती महाराष्ट्राला देणार होते, असे असताना विजय वडेट्टीवार यांनी परीक्षांच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे सांगतानाही लॉक-अनलॉकची माहिती दिली. त्यावरुन माध्यमांनी वृ्त्त दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावरून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना वापरू द्यावेत, जे झाले ते चुकीचे घडले, अशी प्रतिक्रिया दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे झाल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी राजेश टोपे त्यांच्या विषयाशी संबंधित नसणाऱ्या अनेक गोष्टी बोलतात, त्यांना कोणी काही म्हणत नाही आणि मी बोललो तर त्याचा एवढा गहजब का होतो? असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र विजय वडेट्टीवार यांनी जे सांगितले तेच घडले आहे. त्यापेक्षा वेगळे घडले असते, तर आमच्यात सुसंवाद नाही, असा त्याचा अर्थ निघाला असता, असे सांगून मोठेपणा दाखवत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नेत्यांमध्ये चिंता
- प्रत्येक मंत्र्याने आपल्या विभागापुरते बोलावे. विभागाच्या बाहेरची माहिती माध्यमांना देऊ नये. याविषयी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होऊन सर्व मंत्र्यांना सांगण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याने दिली आहे.
- काँग्रेसमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री विजय वडेट्टीवार तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सततच्या विधानांमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांची लवकरच एक बैठक घेतली जावी, तसेच सर्व मंत्र्यांना योग्य पद्धतीने समजावून सांगावे, असा आमचा प्रयत्न राहील, असेही ज्येष्ठ मंत्री म्हणाले.